तृणमूल काँग्रेस, भाजपच्या जाहीरनाम्यात महिला, शेतकऱ्यांवर 'फोकस'... - West Bengal polls: TMC, BJP manifestos maintain focus on women, students, farmers | Politics Marathi News - Sarkarnama

तृणमूल काँग्रेस, भाजपच्या जाहीरनाम्यात महिला, शेतकऱ्यांवर 'फोकस'...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 मार्च 2021

भाजप व तृणमूलच्या जाहीरनाम्यात बहुतांश गोष्टी समान असून महिला, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांवर त्यांनी फोकस केल्याचे पाहायला मिळते.

पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी थेट रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही पक्षांनी बाह्या चांगल्याच सरसावल्या असून जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात आला आहे. भाजप व तृणमूलच्या जाहीरनाम्यात बहुतांश गोष्टी समान असून महिला, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केल्याचे पाहायला मिळते. बंगाली नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यात भाजप तसूभरही कमी नसल्याचे चित्र दिसते. भाजप सत्तेवर आल्यास महिलांना नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळेल. तसेच सार्वजनिक वाहतूक महिलांना मोफत उपलब्ध करून देऊ व केजी टू पीजीदरम्यान मोफत शिक्षणाचा उल्लेख भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात दिसतो. 

तर तृणमूल काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात वर्षभरात ५ लाख नोकऱ्या, महिलांना अर्थसहाय्य, विद्यार्थ्यांना दहा लाखापर्यंत ४ टक्के व्याजाने कर्ज, शेतकऱ्यांना आताच्या ६ हजार एकरवरून १० हजार एकरपर्यंत मदत, असे अनेक मुद्दे जाहीर केले. दरम्यान, सत्तेवर आल्यास सीएए (citizenship amendment act) पहिल्याच वर्षी अंमलात आणू असे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात जाहीर केले. तसेच निर्वासितांच्या कुटुंबियांना वर्षाकाठी १० हजार रुपये व देशाच्या सीमांना आणखी भक्कम तारेचे कुंपण घालून अधिक भक्कम करू, असेही भाजपच्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध केले गेले आहे. 

आमचा जाहीरनामा विकासाला धरून असल्याचा दावा तृणमूल व भाजपने केला आहे. जाहीरनाम्याबाबत बोलताना भाजपचे नेते लोकत चॅटर्जी म्हणाल्या, भाजपचा जाहीरनामा लक्षवेधी आहे. सर्व घटकांची योग्य काळजी या जाहीरनाम्यात घेतली गेली आहे. तर तृणमूल काँग्रेसचे नेते सौगाता राॅय म्हणाले, भाजपने जारी केलेल्या जाहीरनाम्यात भूलथापाच आहेत. बंगाल बाहेरील लोकांकडे कदापि जाणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. दरम्यान, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भाजपच्या जाहीरनाम्याबाबत टीका करताना सीएएमुळे देशाचे विभाजन होईल, अशी भीती वाटत असल्याचे ट्विट केले आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख