अखेर भाजप नेत्याने विधानसभेसाठी दिला खासदारकीचा राजीनामा - West bengal election Swapan Dasgupta tenders his resignation as a Rajya Sabha MP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

अखेर भाजप नेत्याने विधानसभेसाठी दिला खासदारकीचा राजीनामा

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मार्च 2021

नामनिर्देशित खासदार असताना कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करता येत नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विधानसभेच्या उमेदवार यादीत राज्यसभेच्या खासदारांचाही समावेश होता. त्यांच्या उमेदवारीवर तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेतला होता. नामनिर्देशित खासदार असताना कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करता येत नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. काँग्रेसकडूनही राज्यसभा अध्यक्षांना याबाबत पत्र लिहिले होते. त्यानंतर झालेल्या घडामोडीनंतर या नेत्याने खासदारकीचा राजीनामा दिला आहे. 

भाजपचे राष्ट्रीय सचिव अरूण सिंह यांनी नुकतीच बंगालमधील तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील अनुक्रमे २७ व ३६ उमेदवारांची यादी प्रसिध्द केली. त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांना टॉलीगंज मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच खासदार लॉकेट चॅटर्जी, स्वपन दासगुप्ता आणि निशित प्रमाणिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. 

खासदार स्वपन दासगुप्ता यांना भाजपने हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीला तृणमूलने विरोध केला होता. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. दासगुप्ता यांना भाजपने अधिकृतपणे उमेदवारी घोषित केली आहे. भारतीय संविधानातील १० व्या अनुसूचीनुसार राज्यसभेच्या नामनिर्देशित खासदारांनी संसदेत शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांनंतर कोणत्याही राजकीय पक्षात गेल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते.

हेही वाचा : जयललिता यांच्या मृत्यूवरून तमिळनाडूत राजकारण पेटलं

दासगुप्ता यांनी एप्रिल २०१६ मध्ये शपथ घेतली आहे. ते अजूनही राज्यसभेचे सदस्य आहेत. आता त्यांना भाजपमध्ये सामिल होण्याबाबत किंवा खासदारकी बाबत अयोग्य घोषित करायला हवे, असे मोईत्रा यांनी म्हटले आहे. मोईत्रा यांनी संविधानातील १० वी अनुसूचीही ट्विटरवर पोस्ट केली आहे.

हेही वाचा : जर्मनी, इटली, स्पेन अन् फ्रान्सने कोरोना लशीचा वापर थांबवला

तृणमूलसह काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भाजपची कोंडी झाली होती. राज्यसभेचा राजीनामा दिल्याशिवाय दासगुप्ता यांना उमेदवारी अर्ज भरता येणार नव्हता. तर खासदारकी टिकवायची असेल तर विधानसभा निवडणुका लढविता येणार नव्हती. हा मुद्दा पुढे आल्यानंतर भाजपमध्ये खलबते सुरू झाली. त्यानंतर आज दासगुप्ता यांनी राज्यसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा पाठवला आहे. मात्र, अद्याप अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नसल्याचे समजते. दासगुप्ता यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्याने त्यांचा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

दरम्यान, भाजप व तृणमूल काँग्रेसकडून प्रचार सभांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून व्हीलचेअरवर बसून प्रचार सुरू करण्यात आला आहे. जखणी वाघ अधिक आक्रमक असतो, असे म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख