West Bengal Election : गुन्हेगारीचाही "खेला होबे'.. १९१ उमेदवारांपैकी 90 जणांवर अतिगंभीर गुन्हे दाखल  - West Bengal Election: Crimes filed against 90 out of 191 candidates | Politics Marathi News - Sarkarnama

West Bengal Election : गुन्हेगारीचाही "खेला होबे'.. १९१ उमेदवारांपैकी 90 जणांवर अतिगंभीर गुन्हे दाखल 

मंगेश वैशंपायन
शनिवार, 20 मार्च 2021

 निवडणुकीच्या फडातील १९१ उमेदवारांपैकी गंभीर व अतिगंभीर गुन्हे दाखल असलेल्या सर्वपक्षीयांची संख्या ९० (४७ टक्के) इतकी आहे.

नवी दिल्ली  : पश्‍चिम बंगालच्या रमधुमाळीत "खेला होबे' ची घोषणा गाजत असली तरी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीवर नजर टाकली तर निवडणुकीच्या नमनाला गुन्हेगारीचाही" खेला होबे' झालाय की काय, असे वातावरण आहे. कारण पहिल्याच टप्प्यात निवडणुकीच्या फडातील १९१ उमेदवारांपैकी गंभीर व अतिगंभीर गुन्हे दाखल असलेल्या सर्वपक्षीयांची संख्या ९० (४७ टक्के) इतकी आहे. 

सर्वपक्षांनीच गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या २५ टक्के उमेदवारांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी १३ फेब्रुवारीला राजकारणातील गुन्हेगारी घटविण्याबाबत केलेल्या निर्देशांचा फारसा परिणाम न झाल्याचेही उघड आहे. मुख्य पक्षांचे ३३ ते ५६ टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. या टप्प्यात संवेदनशील म्हणजे रेड अलर्ट जाहीर झालेले ७ (२३ टक्के) मतदारसंघ आहेत.

दत्तात्रय होसबळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवीन सरकार्यवाह !

लोकशाही सुधारणांबाबतची एडीआर संस्था व बंगाल निवडणूक वॉचच्या वतीने केलेल्या या अभ्यास पाहणीत या टप्प्यातील उमेदवारांपैकी ४८ जणांवर गंभीर व ४२ जणांवर अतिगंभीर गुन्हे दाखल असल्याची कबुली त्यांनीच निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांत माकपच्या १८ पैकी १० (५६ टक्के), भाजपच्या २९ पैकी १२ (४१), तृणमूल कॉंग्रेसच्या २९ पैकी १० (३५) व कॉंग्रेसच्या ६ पैकी २(३३%) उमेदवारांचा समावेश आहे. अतीगंभीर गुन्हे दाखल झालेल्यांत माकपच्या ९ (५०%) , भाजपच्या ८(२८%), तृणमूलच्या व कॉंग्रेसच्या प्रत्येकी एकेका उमेदवारांचा (१७% व ९%)) समावेश आहे. बसपाचे २ उमेदवारही यात आहेत. याशिवाय महिलांच्या बाबतीतले बलात्कार, अपहरण, आदी गुन्हे नोंद असणाऱ्या उमेदवारांची संख्या या टप्प्यात १२ आहे. खून व खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या २७ इतकी आहे.

 
पहिल्या टप्प्यातील अन्य ठळक नोंदी

  1. ५ वी ते १२ वी पास उमेदवार - ९६(५०%)
  2. पदवीधर व त्यापुढील -९२ (४८%)
  3. पदविकाधारक -३
  4. २५ ते ४० वयोगटातील ५३(२८%)
  5. ६० वर्षांपर्यंतचे १०९ (५७%)
  6. ६१ ते ८० वयोगटातील - २९(१५%)
  7. कोट्यधीश - १९(१०%) (तृणमूलचे सर्वाधिक ४)
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख