West bengal election CM Mamata banerjee lead roadshow on wheelchair
West bengal election CM Mamata banerjee lead roadshow on wheelchair

झुकणार नाही, लढणार! व्हीलचेअरवरून ममतांनी फुंकले रणशिंग

ममतांनी आज व्हीलचेअरवर बसून रोड शोमध्ये सहभाग घेत विरोधकांना इशारा दिला.

कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्या पुढील काही दिवस प्रचारात सहभागी होणार की नाही, अशी चर्चा होती. पण ममतांनी आज व्हीलचेअरवर बसून रोड शोमध्ये सहभाग घेत विरोधकांना इशारा दिला. रोड शो सुरू होण्यापूर्वी त्यांनी ट्विट करून आपण झुकणार नसल्याचे सांगितले. 

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर 10 मार्चला हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला होता. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. काल ममता बॅनर्जी व्हीलचेअरवरुन तडक रुग्णालयातून बाहेर पडल्या. डॉक्टरांनी त्यांना आणखी दोन दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला देऊनही त्यांनी ऐकले नाही. त्यांनी डॉक्टरांना तातडीने डिस्चार्ज देण्याची विनंती केली. अखेर डॉक्टरांनी चर्चा करुन ममतांना रुग्णालयातून सोडण्याचा निर्णय घेतला. 

रुग्णालयातून घरी परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी व्हीलचेअरवर बसून रोड शोमध्ये सहभाग घेतला. रोड शोला सुरूवात होण्यापूर्वी त्यांनी ट्विट केले. ''आम्ही निर्भीडपणे लढत राहणार आहोत. मला आताही खूप त्रास होत आहे. पण मला माझ्या लोकांचा त्रास अधिक जाणवत आहे. आपल्या भूमीच्या रक्षणासाठी या लढाईचे आम्हाला खूप नुकसान झाले असून आम्ही खूप काही झेलावे लागणार आहे. पण आम्ही झुकणार नाही,'' असे ममतांनी म्हटले आहे.

दरम्यान, ममतांनी काल रुग्णालयातून कार्यकर्त्यांसाठी व्हिडीओ संदेश पाठवला होता. सर्वांनी शांत राहावे आणि संयम पाळावा, असे आवाहन त्यांनी केले होते. मला गंभीर दुखापत झाली हे खरे आहे. माझ्या हाताला आणि पायाला दुखापच झाली आहे. हाडांना मार बसला असून, माझ्या छातीतही दुखत आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

मी मोटारीच्या बॉनेटवर बसून लोकांना अभिवादन करत असताना गर्दी माझ्या दिशेने आली. त्यावेळी माझ्या पायाला दुखापत झाली. आता माझ्यावर उपचार सुरू आहेत. मी दोन ते तीन दिवसांत परत येईन. माझ्या पायाची समस्या पुढील काळातही कायम राहील पण मी त्यावर मात करेन. यामुळे प्रचारसभांवर कोणताही परिणाम होणार नाही. मी व्हीलचेअरवर फिरेन आणि यासाठी मला तुमची मदत लागेल, असेही ममतांनी म्हटले होते. 

ममता बॅनर्जी या 10 मार्चला नंदिग्राममध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला होता. ममता या मोटारीत बसत असताना त्यांच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. सुरक्षारक्षकांनी ममतांना उचलून मोटारीत बसवल्याचे दिसले. या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com