सीबीआयच्या आधीच ममता बॅनर्जी पोहचल्या भाच्याच्या घरी... - West Bengal CM Mamata Banerjee arrives at nephew Abhishek Banerjees residence | Politics Marathi News - Sarkarnama

सीबीआयच्या आधीच ममता बॅनर्जी पोहचल्या भाच्याच्या घरी...

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

आज सीबीआयकडून रुजिरा बॅनर्जी यांची चौकशी केली जाणार आहे.

कोलकता : कोळसा घोटळ्याप्रकरणी सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी धावल्या आहेत. आज सीबीआयकडून रुजिरा बॅनर्जी यांची चौकशी केली जाणार आहे. मात्र, त्याआधीच ममतादीदी त्यांच्या घरी पोहचल्या. 

अभिषेक बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत. अभिषेक यांची पत्नी रुजिरा यांना सीबीआयने रविवारी चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. त्यावर रुजिरा यांनी आज चौकशीसाठी तयार असल्याचे उत्तर सीबीआयला दिले होते. त्यानुसार सीबीआय अधिकाऱ्यांची टीम त्यांच्या घरी पोहचली आहे. पण त्याआधीच ममता बॅनर्जी या तिथे पोहचल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

पश्चिम बंगालमधील पुढील काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवरच बॅनर्जी कुटूंबियांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकारकडून सीबीआयचा वापर केला जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. त्यामुळे बंगालमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ममता बॅनर्जी यांनी आज अभिषेक यांच्या घरी जात तृणमूल काँग्रेस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिला आहे. तसेच भाजपला एकप्रकारे इशारा दिल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा : गुजरातमधील महापालिका निवडणुकीत भाजपचाच डंका

दरम्यान, रुजिरा यांच्या बहीण मेनका यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी कोलकता येथील त्यांच्या घरी चौकशी केली. सुमारे तीन तास चौकशी सुरू होती. त्यानंतर आज रुजिरा यांची चौकशी सुरू होत आहे.

काय आहे प्रकरण?

सीबीआयने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कोळसा चोरी रॅकेटमध्य मांझी उर्फ लाला, ईस्टर्न कोलफील्ड लिमिचेडचे महाव्यवस्थापक अमित कुमार धर, जयशे चंद्र राय आणि सुरक्षा रक्षक तन्मय दास, धनंजय राय, देबाशीष मुखर्जी यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. लाला आणि इतरांनी कोळसा खाणींमध्ये बेकायदेशी खोदाई करून चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याच प्रकरणात रुजिरा बॅनर्जी यांचीही चौकशी केली जात आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख