भाजप खासदारांना करायचीय बंगालची फाळणी; सात नेते तृणमूलच्या वाटेवर

पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर भाजपला अजूनही धक्के बसत आहेत.
West Bengal Bjps seven leader will join Trinamool Congress
West Bengal Bjps seven leader will join Trinamool Congress

कोलकता : पश्चिम बंगालमधील निवडणूक (West Bengal Election) निकालानंतर भाजपला अजूनही धक्के बसत आहेत. राष्ट्रीय उपाध्यक्ष व त्यांच्या मुलाने पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर आणखी सात नेते तृणमूलच्या वाटेवर आहेत. त्यामागे बंगालच्या फाळणीचे कारण असून भाजपच्या काही खासदारांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे अनेक नेते या खासदारांवर नाराज असल्याची चर्चा आहे. (West Bengal Bjps seven leader will join Trinamool Congress)

भाजपचे उत्तर बंगालमधील खासदार जॅान बारला यांनी बंगालच्या विभाजनाची मागणी केली आहे. त्यांना याच भागातील भाजपच्या आणखी एका खासदाराने पाठिंबा दिला आहे. पश्चिम बंगालचे विभाजन करून उत्तर बंगालला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्यावा, अशी या खासदारांची मागणी आहे. बारला हे उत्तर बंगालमधील चार खासदारांपैकी एक आहेत. त्यांची मागणी जयंता रॅाय यांनीही उचलून धरली आहे. 

बारला यांच्या या मागणीवर आता भाजपमधूनच जोरदार विरोध सुरू झाला आहे. बारला यांच्या अलीपुरदौर मतदारसंघातील भाजपचे जिल्हाध्यक्ष गंगा प्रसाद शर्मा यांनी थेट राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. त्यांच्यासह या मतदारसंघातील सात नेते पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बारला यांच्याविरोधात तृणमूलकडून आंदोलन केले जात आहे. 

बारला यांच्याकडून उत्तर बंगालमध्ये राजकीय हिंसाचार पसरवला जात आहे. त्यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची मदत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे. भाजपच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी पक्ष सोडत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, बारला यांच्या मागणीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनीही विरोध केला आहे. 

भाजपचा असा कोणताही अजेंडा नाही. बारला हे पक्ष कार्यकारिणीच्या कोणत्याही पदावर नाहीत, असे घोष म्हणाले. तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे. निवडणुकीत परभव झाल्यानंतर ते बंगालची फाळणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बंगालच्या विभाजनात कुणाला अधिक रस आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बंगालचे विभाजन होऊ देणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com