'गोली मारो'चे नारे देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना अटक अन् पोलिस अधिकाऱ्याचा राजीनामा

हिंसा भडकविण्याचा आरोप ठेवत भाजपचे स्थानिक नेते सुरेश शॉ व आणखी दोघांना एका व्हिडिओच्या आधारे अटक करण्यात आली होती.
West Bangal Police officer resigns who arrested BJP workers
West Bangal Police officer resigns who arrested BJP workers

कोलकता : भाजपच्या रॅलीदरम्यान 'गोली मारो'चे नारे देणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केलेल्या पोलिस अधिकाऱ्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले असले तरी यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. भाजप व तृणमुल काँग्रेसकडून एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. 

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच दोन्ही पक्षांकडून सभांसह विविध माध्यमातून शक्तीप्रदर्शन केले जात आहे. तृणमुलला रामराम ठोकून काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये आलेले सुवेंदु अधिकारी यांनी 21 जानेवारी रोजी एका रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीदरम्यान काही कार्यकर्त्यांनी 'गोली मारो' अशी घोषणाबाजी केली होती. त्यांना हुमायूं कबीर या पोलिस अधिकाऱ्याने अटक केली होती. ते कोलकता जवळील चंदननगरचे पोलिस आयुक्त आहेत. डिसेंबर महिन्यातच त्यांची बढती झाली होती. 

हिंसा भडकविण्याचा आरोप ठेवत भाजपचे स्थानिक नेते सुरेश शॉ व आणखी दोघांना एका व्हिडिओच्या आधारे अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच कबीर यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तृणमुलचे खासदार सौगत रॉय यांच्या म्हणण्यानुसार, नारेबाजीनंतर करण्यात आलेली अटक ही पुर्णपणे पोलिसांचा अंतर्गत मुद्दा आहे. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही. 

या अटकेवरून भाजपाकडून आरोप करण्यात आले होते. तृणमुलच्या काही कार्यकर्त्यांनी कोलकतामध्ये एक दिवसआधीच अशाचप्रकारे नारे दिले होते. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. भाजपने यासंदर्भात पक्षपातीपणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमुलला सातत्याने धक्के बसत आहेत. पक्षाचे आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढत चालली आहे. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडली जात नाही. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान काही जणांनी जय श्रीराम असे नारे दिले होते. त्यावरून ममतादीदी चांगल्या भडकल्या होत्या. कार्यक्रमाला बोलवून अपमान केल्याची भावना व्यक्त करून त्यांनी भाषण थांबविले होते. त्यावरूनही बरेच राजकारण झाले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com