अॅटीबॅाडी कॅाकटेलचा डोस घेतला अन् ८२ वर्षांचे आजोबा दुसऱ्याच दिवशी गेले घरी

इंजेक्शनमुळं विषाणूंची वेगाने होणारी वाढ रोखली जाते.
Virus multiplication drops after antibody cocktail dose says Naresh Trehan
Virus multiplication drops after antibody cocktail dose says Naresh Trehan

नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, अजूनही लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच आता 'अॅंटीबॅाडी कॅाकटेल' (Antibody Cocktail) असे म्हटले जाणारे नवीन इंजेक्शन बाजारात आले आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर याच इंजेक्शनचा डोस देण्यात आला होता. सुरूवातीच्या काळात रुग्णाच्या शरीरातील विषाणूंचे प्रमाण (Viral Load) कमी करण्यात या इंजेक्शनचा डोस परिणामकारक ठरत असल्याचा दावा केला जात आहे. (Virus multiplication drops after antibody cocktail dose says Naresh Trehan)

रोशे इंडिया या औषध उत्पादक कंपनीने हे औषध सोमवार (ता. २४) पासून भारतात उपलब्ध केले आहे. गुडगांव येथील मेदांता रुग्णालयातील ८२ वर्षांच्या कोरोनाबाधित रुग्णाला हे इंजेक्शन देण्यात आले. या रुग्णालयात हे इंजेक्शन घेणारे ते पहिलेच रुग्ण होते. त्यांना इतर काही आजारही आहेत. इंजेक्शन घेतल्यानंतर त्यांना आज घरी सोडण्यात आले. अशी माहिती रुग्णालयाचे अध्यक्ष डॅा. नरेश त्रेहान यांनी दिली. 

डॅा. त्रेहान म्हणाले, इंजेक्शन देऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णाच्या आम्ही सतत संपर्कात राहणार आहोत. या इंजेक्शनमुळं विषाणूंची वेगाने होणारी वाढ रोखली जाते. ज्या रुग्णांमध्ये अधिक Viral Load आहेत तसेच जे रुग्ण अति जोखमीच्या गटात आहेत, त्यांना याचा खूप फायदा होणार आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. संसर्ग झाल्यानंतर पहिल्या सात दिवसांत इंजेक्शन दिल्यास रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी ७० ते ८० टक्के रुग्णांना रुग्णालय येण्याची गरज भासत नसल्याचे अनुभवातून दिसून आलं आहे. हे इंजेक्शन कोरोना विषाणूच्या B.1.617 या घातक प्रकारावरही परिणामकारक ठरत आहे. हे कोरोनाविरूध्दच्या लढ्यातील नवीन शस्त्र असल्याचा दावाही त्यांनी केला.

काय आहे हा कॅाकटेल डोस?

Casirivimab आणि Imdevimab या दोन औषधांना एकत्रित करून हे अॅंटीबॅाडी कॅाकटेल बनविण्यात आले आहे. प्रत्येक १२०० मिलीग्रॅमच्या डोसमध्ये ही औषधे समप्रमाणात एकत्र केली जातात. त्यातून हा कॅाकटेल डोस तयार होतो. प्रत्येक पॅकमध्ये दोन रुग्णांवर उपचार होऊ शकतात. या एका पॅकची किंमत १ लाख १९ हजार ५०० एवढी आहे. तर एका डोससाठी ५९ हजार ७५० रुपये मोजावे लागतील, असे कंपनीकडून जाहीर करण्यात आलं आहे. 

हे औषध मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना दिले जाऊ शकते. औषध घेतल्यानंतर रुग्णालयात भरती होण्याचा किंवा मृत्यूचा धोका ७० टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केलं आहे. भारतामध्ये सध्या एक लाख पॅक उपलब्ध करून देण्यात आल्याचे सिप्ला कंपनीकडून सांगण्यात आले. सिप्लाकडून हे औषध भारतीय बाजारात आणण्यात आले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे औषध सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकेल. केंद्रीय औषध प्रमाण नियंत्रक संस्थेने (CDSCO) ने या औषधाला आप्तकालीन वापरासाठी नुकतीच मान्यता दिली आहे. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com