विजय रुपानी, नितीन पटेल यांच्या चेहऱ्यावरची नाराजी लपली नाही...

नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या मास्टरस्ट्रोकने गुजरात भाजप अचंबित
Nitin Patel_Vijay Rupani
Nitin Patel_Vijay Rupani

गांधीनगर :  गुजरातमध्ये (Gujrat) पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यामध्ये नवा ‘राज’दरबार अस्तित्वात आला. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्या मंत्रिमंडळातील २४ मंत्र्यांचा शपथविधी आज राजभवनात पार पडला. यातील २१ जण हे पहिल्यांदाच मंत्री बनले आहेत.

विशेष म्हणजे मागील विजय रुपानी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही सदस्याला नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राज्याचे सतरावे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल (वय ५९) यांनी सोमवारीच शपथ घेतली होती. सध्या डॅमेज कंट्रोलच्या भूमिकेत असलेल्या भाजप नेतृत्वाने रुपानी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही नेत्याला नव्याने संधी देणे टाळल्याचे दिसते.

मुख्यमंत्रिपदी पाटीदार नेते भूपेंद्र पटेल यांना संधी देऊन भाजपने या समुदायाला जवळ करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. याशिवाय सहा पाटीदार नेत्यांनाही मंत्री करण्यात आले असून तितक्याच ओबीसी नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे. अनुसूचित जातींमधील चार आणि जमातींमधील तीन, ब्राह्मण आणि क्षत्रिय समुदायातील प्रत्येकी दोन आणि जैन समुदायातील एका नेत्याची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे.

नितीन पटेल यांनाही संधी नाही
टीम रुपानीमधील वजनदार नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही. पटेल यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी पाच पाचच्या गटाने आज शपथ घेतली. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या राजेंद्र त्रिवेदी यांनी अवघ्या तासाभरातच मंत्रिपदाची शपथ घेतली.

रुपानींचा गट नाराज
अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना डावलण्यात आल्याने भाजपमधील प्रस्थापित नेते मंडळी नाराज झाली आहेत. विशेषतः रुपानी समर्थक गटामध्ये ही नाराजीची भावना अधिक तीव्र असल्याचे दिसते. माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या चेहऱ्यावर देखील नाराजी दिसून येत होती पण त्यांनी याबाबत माध्यमांशी उघडपणे बोलण्याचे टाळले. लोक येतात आणि जातात. समर्थकांची नाराजी होणे साहजिक आहे पण ती आमची जबाबदारी नाही. पक्षाचे नेतृत्वानेच यात लक्ष घालावे असे ते म्हणाले.

``गुजरात मंत्रिमंडळातील नव्या सहकाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो. जनतेच्या सेवेसाठी आणि पक्षाचा विकासाच्या अजेंड्याचा प्रसार करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी आपले अवघे आयुष्य समर्पित केले आहे. भावी वाटचालीसाठी या सर्व मंडळींना मनापासून शुभेच्छा,`` अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com