नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारने विविध योजनांची घोषणा केली आहे. दोन्ही राज्यात मुख्यमंत्र्यांनी मतदारांना खुश करण्यासाठी विविध योजनांचा खैरात केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कामगारांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी रोजगार योजनेअंतर्गत रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय ममता बँनर्जी यांनी घेतला आहे. या वाढीचा फायदा राज्यातील ५६ हजार ५०० कामगारांना होणार आहे. त्यामध्ये ४० हजार ५०० कसल्याही प्रकारची कौशल्ये नसलेले कामगार आणि ८ हजार अर्धकुशल आणि आठ हजार कुशल कामगारांचा समावेश आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनीही काल शेतकरी आणि कामगारांना सोने तारण ठेवून देण्यात आलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पूजा चव्हाण मृत्य प्रकरणावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या... https://t.co/BysR9hczfM #SanjayRathore #SharmilaThackeray #RajThackeray #marathilanguageday #MNS #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNews #ShivSena #BJP #Mumbai
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 27, 2021
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पाचही राज्यांतील मतमोजणी एकाचदिवशी 2 मे रोजी होणार आहे. तमिळनाडू, केरळ व पुदुच्चेरीमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तिन्ही राज्यात 6 एप्रिल रोजी मतदान होईल. तर आसाममध्ये तीन टप्प्यांत तर पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या. तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडूण आले. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 28 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे.
तमिळनाडूमध्ये सध्या एआयडीएमकेची सत्ता असली तरी आगामी निवडणुकीत पक्षांतून निलंबित करण्यात आलेल्या शशिकला यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे. तुरूंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी तसे संकेतही दिले आहेत. तमिळनाडू विधानसभेत 234 आमदार असून सध्या एआयडीएमके आघाडीकडे 134 जागा आहेत. डीएमके आणि काँग्रेसच्या आघाडीला 98 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला या राज्यात खाते खोलता आले नाही. मात्र, यावेळी भाजपने सत्ताधारी पक्षासोबत आघाडी केली आहे. त्यामुळे यावेळी भाजपला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

