काँग्रेसच्या काळात आसामचा विकास खुंटला, वातावरणही अस्थिर... - Vajpayee, PM Modi govt paid respect to Assam's culture; Congress neglected it: Nadda | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसच्या काळात आसामचा विकास खुंटला, वातावरणही अस्थिर...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 मार्च 2021

काँग्रेस सत्तेवर आल्यास आसाममधील संस्कृतीचा नायनाट होईल. काँग्रेसला मत म्हणजे संधीसाधू राजकारण, विकास नाकारणे व आसामला अंधाराच्या युगात ढकलणे याला मत होय, अशी जहरी टीका भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. 

आसाम: आसाममधील विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच पेटू लागले असून राजकारण्यांकडून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच असल्याचे दिसते. काँग्रेसच्या काळात आसामचा विकास खुंटला असून परिस्थिती भयानक होती, तसेच वातावरण बहुतांश काळ अस्थिर होते, असा दावा भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी केला. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी आसामच्या संस्कृतीचा कायम आदरच केला असल्याचे सांगितले. 

आसाममधील दिब्रुगढ येथे प्रचारसभेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. नड्डा पुढे बोलताना म्हणाले, काँग्रेसने आतापर्यंत आसामच्या संस्कृतीचा, परंपरेचा अनादरच केला आहे. गोपीनाथ बोरडोई यांना भारत रत्न मिळण्याकरिता अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार येईपर्यंत १९९९ सालापर्यंत वाट पाहावी लागली. तसेच भुपेन हझारिका यांना देखील तशीच वाट पाहावी लागली असून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हझारिका यांना भारतरत्न मिळाले, असेही नड्डा यांनी स्पष्ट केले. 

काँग्रेसवर टीका करताना नड्डा म्हणाले, काँग्रेस सत्तेवर आल्यास आसाममधील संस्कृतीचा नायनाट होईल. काँग्रेसला मत म्हणजे संधीसाधू राजकारण, विकास नाकारणे व आसामला अंधाराच्या युगात ढकलणे होय, अशी जहरी टीका नड्डा यांनी केली.  बोडोलँड बाबत बोलताना नड्डा म्हणाले, काँग्रेसच्या काळात बोडोलँड प्रकरण घडले. बोडोलँडच्या प्रकरणावेळी अनेकांची हत्या व अनेकांना ओलीस ठेवले गेले. त्या काळात देशाच्या सीमांवरही अस्थिर वातावरण होते. 

सध्या देशात काँग्रेस हा एकमेव संधीसाधू पक्ष असून केरळमध्ये त्यांनी मुस्लिम लीगशी हातमिळवणी केली. तर आसाममध्ये बद्रुद्दीन अजमलच्या पक्षाशी हातमिळवणी केली, अशी माहितीही नड्डा यांनी दिली. दरम्यान, आसाममधील विधानसभा निवडणुका २७ मार्चपासून तीन टप्प्यात होत असून मतमोजणी २ मे रोजी होईल.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख