डेहराडून : हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 200 कर्मचारी अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. पण गुरूवारी दुपारी नद्यांमधील पाणी वाढू लागल्याने बचावकार्य थांबविण्यात आले आहे. हा परिसर तात्पुरता रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरात रविवारी हिमकडा कोसळून नद्यांना महापूर आला. अचानक आलेल्या या पुरामुळे तपोवन परिसरात काम करण्यात आलेले कामगार वाहून गेले. या दुर्घटनेची तीव्रता व्हिडिओमध्येही कैद झाली आहे. कामगार बचावासाठी प्रयत्न करत असताना पाण्यासह दगड-मातीच्या लोंढ्यासोबत कर्मचारी वाहून गेल्याचे दिसते. यांसह तपोवन ऊर्जा प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये काम करत असलेले कर्मचारीही या दुर्घटनेनंतर बेपत्ता झाले आहेत.
Uttarakhand: Operation resumes at tunnel in Joshimath, Chamoli dist after it was temporarily halted following a rise in water level of Rishiganga river. NDRF personnel say, "Water level is rising so teams were shifted to safer locations. Operation has resumed with limited teams." pic.twitter.com/ljf34QUUNq
— ANI (@ANI) February 11, 2021
दुर्घटनेनंतर काही वेळातच बचाव कार्य सुरू करण्यात आले. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस, आपत्कालीन विभागासह विविध यंत्रणा मागील चार दिवसांपासून बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहेत. मात्र, गुरूवारी बोगद्यामध्ये काम करत असलेले जवान काम अर्धवट सोडून बाहेर आले. बोगद्यामध्ये पाणी वाढत असल्याचा अलर्ट दिल्याने काम थांबविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाल्याचे उत्तराखंड सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काही जणांचे मृतदेह तपोवनपासून 45 किलोमीटर अंतरावर सापडले. त्यापैकी केवळ 8 जणांची ओळख पटली आहे. इतरांच्या ओळख पटवली जात आहे. डीएनएद्वारे त्यांची ओळख पटविली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, हिमस्खलनामुळे हिमकडा कोसळल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून केला जात आहे. आधी हिमस्खलन झाल्यानंतर हिमकडा कोसळून ऋषीगंगा व धौली गंगा नद्यांना पूर आला. पर्वतांना असलेल्या तीव्र उतारांमुळे पाण्याचा वेगही वाढला. त्यामुळे पाण्यासोबत दगड, माती वेगाने वाहत आले. परिणामी, कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यासही वेळ मिळाला नाही.
Edited By Rajanand More

