ढगफुटीने झाले होत्याचे नव्हते... आज आठवली ती काळरात्र! - uttarakhand rememberd that cloudburst after glacier burst incident | Politics Marathi News - Sarkarnama

ढगफुटीने झाले होत्याचे नव्हते... आज आठवली ती काळरात्र!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

देवभूमी म्हटल्या जाणाऱ्या उत्तराखंडला नैसर्गिक संकटांचा सतत सामना करावा लागतो. रविवारी घडलेल्या घटनेने अशाच एका दुर्घटनेची थरकाप उडविणारी दृश्य डोळ्यासमोर आली.

डेहराडून : देवभूमी म्हटल्या जाणाऱ्या उत्तराखंडला नैसर्गिक संकटांचा सतत सामना करावा लागतो. रविवारी घडलेल्या घटनेने अशाच एका दुर्घटनेची थरकाप उडविणारी दृश्य डोळ्यासमोर आली. 2013 मध्ये 16 जून रोजी ढगफूटी आणि मोठ्या प्रमाणावर बर्फ वितळल्याने उत्तराखंडमधील नद्यांना महापूर आला. या विनाशकारी पूराने सुमारे 5 हजार लोकांचा जीव घेतला. हजारो घरे, दुकाने वाहून गेली. 

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात रेनी गावाजवळ हिमकडा कोसळळ्या नदीला पूर आला. या दुर्घटनेत 100 ते 150 जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही वेळातच उत्तराखंडसह देशभरात या घटनेची दृश्य पोहचली. उत्तराखंडमधील नागरिकांच्या जणू काळजाचा ठोका चुकला. 2013 मध्ये घडलेल्या महाभयंकर दुर्घटनेच्या आठवणी अजून ताज्या असताना ही घटना घडली. 

2013 मध्ये काय घडले?
उत्तराखंडमध्ये 13 ते 17 जून या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. मॉन्सूनच्या काळात पडणाऱ्या पावसापेक्षा या दिवसांतील पावसाचे प्रमाण खूप होते. त्यातच चौराबाडी येथील हिमकड्यावरील बर्फ वितळू लागले. एकीकडे ढगफूटी अन् हिमकडा वितळू लागल्याने ता. 16 व 17 जूनला मंदाकिनी नदीला महापूर आला. या पूरामध्ये उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशलाही मोठा फटका बसला. 

रुद्रप्रयाग, चमोली, उत्तरकाशी, बागेश्वर, अलमोडा, पिथौरागढ जिल्हयांत सर्वाधिक नुकसान झाले. यामध्ये सुमारे साडे चार हजार लोकांचा मृत्यू झाला. अनेकजण बेपत्ता झाले. नद्यांवरील पूल वाहून गेल्याने ब्बल 4 हजारांहून अधिक गावांचा संपर्क तुटला. जवळपास तेराशे हेक्टर जमीन पुरात वाहून गेली. सुमारे 2200 घरे तर 100 हून अधिक छोटी-मोठी हॉटेल वाहून गेली. 

यात्रा मार्गावरील सुमारे 90 हजार यात्रेकरून आणि 30 हजार स्थानिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या दुर्घटनेत नऊ राष्ट्रीय महामार्ग, 35 राज्य महामार्ग, 2300 रस्ते, आणि जवळपास 200 पूल वाहून गेले किंवा त्याचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेतून सावरण्यासाठी उत्तराखंडला चार ते पाच वर्षे लागली. आजही अनेक भागात या विनाशकारी पूराच्या खूणा दिसतात. 

केदारनाथचे मोठे नुकसान

यात्रेकरूंचे श्रध्दास्थान असलेल्या केदारनाथला महापूराचा मोठा फटका बसला होता. या घटनेत केदारनाथ मंदीराचे फारसे नुकसान झाले नाही. मात्र, पाण्याच्या वेगवान प्रवाहात मंदीर परिसर पुर्णपणे वाहून गेला. गौरीकुंड पासून केदारनाथला जाणारी पायवाट रामबाडा आणि गरूचट्टीवरून जात होती. पण मंदाकिनी नदीला आलेल्या पुरामुळे रामबाडाचे अस्तित्वच मिटले. त्यामुळे 2014 मध्ये यात्रेचा मार्ग बदलावा लागला. 2018 पर्यंत केदारनाथच्या पुर्ननिर्माणाचे काम सुरू होते. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख