कोव्हॅक्सिनला अमेरिकेत मंजूरी नाहीच! भारत बायोटेकला झटका - US FDA rejects application of emergency use of Covaxin | Politics Marathi News - Sarkarnama

कोव्हॅक्सिनला अमेरिकेत मंजूरी नाहीच! भारत बायोटेकला झटका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जून 2021

भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचा समावेश इमर्जन्सी यूज लिस्टिंगमध्ये (ईयूएल) करावा, यासाठी डब्लूएचओकडे अर्ज केला आहे.

नवी दिल्ली :  भारतीय लस असलेल्या कोव्हॅक्सिनला अमेरिकेत (US) तातडीच्या वापराची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळं भारत बायोटेकला मोठा झटका बसला आहे. भारतामध्ये कोव्हॅक्सिनला जानेवारी महिन्यातच मान्यता मिळाली असून मोठ्या प्रमाणावर त्याचा वापरही सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत वापरासाठी अर्ज करण्यात आला होता. अद्याप या लशीला जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) मान्यता दिलेली नाही. (US FDA rejects application of emergency use of Covaxin)

भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचा समावेश इमर्जन्सी यूज लिस्टिंगमध्ये (ईयूएल) करावा, यासाठी डब्लूएचओकडे अर्ज केला आहे. जुलै अथवा सप्टेंबर महिन्यात लशीला मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. जगभरातील 60 देशांमध्ये कोव्हॅक्सिनला मान्यता मिळणे प्रलंबित आहे. यात अमेरिका, ब्राझील, हंगेरी आदी देशांचा समावेश आहे. आतापर्यंत 13 देशांमध्ये या लशीला मान्यता मिळाली आहे. आणखी देश मान्यता देण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा : चर्चा तर होणारच; ममता बॅनर्जी अन् सोशॅलिझम विवाहबंधनात  अडकणार

अमेरिकेमध्ये ऑक्युजेन या सहकारी कंपनीमार्फत लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कंपनीने अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) कोव्हॅक्सिनला तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्यासाठी अर्ज केला होता. पण हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. आता लशीला अमेरिकेमध्ये मान्यतेसाठी संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यासाठी बायोलॅाजिक लायसन्स अॅप्लीकेशन (BLA) करावे लागेल. 

BLA कडे अर्ज करताना अतिरिक्त माहिती व डाटा देण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेत लस उपलब्ध करून देण्यास विलंब होणार असल्याचे मुख्य ऑक्युजेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मुसुनिरी यांनी दिली. भारतात कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची माहिती सहा महिन्यानंतरही प्रसिध्द करण्यात आलेली नाही. त्यामुळं भारतातीही वाद निर्माण झाला आहे. 

डब्लूएचओने फायजर, मॉडर्ना आणि कोव्हिशिल्ड या कोरोना लशींना मान्यता दिली आङे. परंतु, या लशींच्या यादीत कोव्हॅक्सिन नाही. या लशीच्या परिणामकारकतेबाबत आणखी माहिती सादर करावी लागेल, असे डब्लूएचओचे म्हणणे आहे. यावर भारत बायोटेकने म्हटले आहे की, डब्लूएओची मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक असलेली 80 टक्के कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. उरलेली कागदपत्रे जून महिन्यात सादर केली जातील. लवकरात लवकर आम्हाला ही परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख