बिहारमध्ये बेरोजगारी, स्थलांतर, उपासमारी वाढली, सोनिया गांधींची नितीशकुमारांवर टीका  - Unemployment, migration, hunger increase in Bihar, Sonia Gandhi criticizes Nitish Kumar | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमध्ये बेरोजगारी, स्थलांतर, उपासमारी वाढली, सोनिया गांधींची नितीशकुमारांवर टीका 

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

सोनिया यांनी आज बिहारमधील निवडणूकीबाबत दोन ट्‌विट केले आहेत.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारवर बिहारमधील युवा वर्ग नाराज आहे. हे सरकार सत्ता आणि अहंकाराने पछाडले आहे. त्यामुळे बिहारमधील जनता बदल घडवून आणेल असा विश्वास कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे. 

सोनिया यांनी आज बिहारमधील निवडणूकीबाबत दोन ट्‌विट केले आहेत. या ट्‌विटमध्ये त्यांनी नितीशकुमार सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की देशाची अर्थव्यवस्था मोठ्या संकटातून जात आहे. हे सरकार सत्ता आणि अहंकाराने पछाडले आहे.

राज्यातील कामगार, शेतकरी चिंताग्रस्त आहे आणि युवा वर्ग निराश आहे. या सरकारने या वर्गासाठी काहीही केले नाही. या सर्व गोष्टीचा विचार करून बिहारी जनता कॉंग्रेस, राजद आघाडीच्या उमेदवारांना साथ देतील त्यांना निवडून आणतील असा मला विश्वास आहे. राज्यातील जनतेने आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

बिहारच्या हातात गुणवत्ता, कौशल्य आणि सामर्थ्यही आहे. मात्र या राज्यातील सरकारने कोणतेही त्याबाबत निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे राज्यात उपासमारी, स्थलांतर, बेरोजगारी वाढली आहे. उपासमारीमुळे बिहारी जनतेच्या डोळ्यात अश्रू आहेत, त्यामुळे काय बोलावे यासाठी माझ्याकडे शब्दही नाहीत. गुन्हेगारी आणि भितीच्या आधारे सरकार सत्तेवर येऊ शकत नाही. बिहारमधील जनता कॉंग्रेस, राजद आघाडीच्या उमेदवारांना निवडून देतील. येथे सत्तांतर होईल असा विश्वासही सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे. 

राज्यात सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान आणि राजदचे नेते तेजस्वी यादव हे दोन्ही नेते मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर सडकून टीका करीत आहे. नितीशचाच्या थकले आहेत त्यांना आता सत्तेवरून पाय उतार व्हावे लागेल असे सांगत आहेत. तर पासवान हे नितीशकुमार यांना कदापी मुख्यमंत्री करू नका असे आवाहन करीत आहेत. जेथे आपल्या पक्षाचे उमेदवार नाहीत तेथे भाजपला मतदान करा असे आवाहन करीत आहेत. 

दरम्यान, उद्या बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत असून आठ मंत्र्यांसह मोठ्या नेतेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख