उदयनराजेंचा मोदींना घरचा आहेर.. कांदा निर्यातबंदीचा निर्णय चुकीचा.. - Udayan Raje says the decision to ban onion exports is wrong | Politics Marathi News - Sarkarnama

उदयनराजेंचा मोदींना घरचा आहेर.. कांदा निर्यातबंदीचा निर्णय चुकीचा..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

कांदा निर्यात बंदीचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे नमूद करून उदयनराजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : "केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यानां उद्ध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतकऱ्याना दिलासा द्यावा," अशी मागणी राज्यसभेतील भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

कांदा निर्यात बंदीचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे नमूद करून उदयनराजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठविले आहे. उदयनराजे यांनी हे पत्र पाठवून भाजपला घरचा आहेर दिला आहे. 

ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी बाबत सरकारने घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या कांदा निर्यातबंदीबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

जेव्हा भाव कोसळतात तेव्हा कांदा फेकावा लागतो. पण आज कांद्याला चांगला भाव मिळत असताना असा निर्णय घेणे यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी त्वरीत मागे घ्यावी, जेणेकरुन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. कांद्याचे उत्पादन करणारा शेतकरी हा गरीब आहे.

कोरोना काळात खरं तर संपूर्ण देशाला सावरण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं. संपूर्ण देशाला अन्नधान्य आणि भाजीपाल्याची कमतरता भासू दिली नाही. आज जगभरात कांद्याला मोठी मागणी आहे. अशावेळी निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे, असे त्यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे. 

उदयनराजे भोसले म्हणतात की आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कांद्यावर अवलंबून आहे. तरी केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय, या तीनही मंत्रालयांनी व्यापक हित लक्षात घ्यावे. अन्यथा अचानक केलेल्या निर्यातबंदीमुळे भारताच्या निर्यात धोरणाला जागतिक स्तरावर फटका बसू शकतो, याचाही आपण विचार करावा ही आग्रहाची विनंती.

लॉकडाउनच्या काळात संकटातून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार हे आता कुठे सावरत असताना ही अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल आणि त्यांचे फार मोठे नुकसान होईल, याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपण कांद्यावरची निर्यातबंदी त्वरीत उठवावी, अशी विनंती उदयनराजेंनी केंद्र सरकारला केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख