उत्तर प्रदेशात त्या दोन साधूंची हत्या या कारणामुळे!

उत्तर प्रदेशात साधूंची हत्या झाल्याचे त्याचे पडसाद राजकीय पटलावरही उमटत आहेत. महाराष्ट्रातील पालघऱ येथे झालेल्या हत्येनंतर येथील सरकारला धारेवर भाजपने धरले होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून सल्ल्याचे चार शब्द सांगितले.
yogi-uddahv
yogi-uddahv

लखनौ : उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील पागोना गावात दोन साधूंची हत्या करण्यात आली. सोमवारी (ता. २७) रात्री ही घटना घडली. यात मुरारी उर्फ राजू नावाच्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

गावातील मंदिरात ग्रामस्थांना आज दोन साधूंचे मृतदेह आढळले. धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केल्याचे दिसून आले.
मृत साधूंचे नाव जगदीश उर्फ रंगीदास (वय ५५) आणि शेरसिंग (वय ४६) असे आहे. आरोपी रंगीदास यांचा शिष्य होता. या दोघांनी राजूवर त्यांचा चिमटा चोरल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यावरुन झालेल्या वादावादीतून राजूने दोन्ही साधूंची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. राजूने गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती बुलंदशहरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संतोषसिंग यांनी दिली. राजूला अटक केली तेव्हा तो नशेच्या अमलाखाली होता. तो भानावर आल्यानंतर पुढील चौकशी केली जाईल, असे सिंग यांनी सांगितले.

प्रियांका गांधींची टीका
बुलंदशहरमधील या घटनेवरुन विरोधकांनी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारवर निशाना साधला आहे. माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या प्रकरणी राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील कायदा व व्यवस्थेवरुन आदित्यनाथ सरकारवर यांच्यावर टीका केली.

कठोरातील कठोर शिक्षा करा
साधूंचे वास्तव्य असलेल्या मंदिरात पोलिस तैनात केले आहेत. या घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांनी तातडीने पावले उचलत घटनास्थळाला भेट देऊन संपूर्ण अहवाल देण्याचा वरिष्ठ पोलिसांना दिला आहे. यातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.


ठाकरेंकडून चिंता व्यक्त
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात उत्तर प्रदेशमधील दोन साधूंना मुले पळविणारे समजून जमावाने ठार मारल्याची घटना ताजी असतानाच बुलंदशहरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज योगी आदित्यनाथ यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून दोन साधूंच्या हत्येबाबत चिंता व्यक्त केली अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली. अशा घटना घडतात तेव्हा आपण त्याचे राजकारण न करता दोषींना शिक्षा होण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत, असे ठाकरे म्हणाले. या आधी ‘उत्तर प्रदेशमधील साधूंच्या हत्येची घटना ही भयानक व अमानुष आहे. पण पालघरमधील घटनेप्रमाणे या हत्येला धार्मिक रंग न देण्याचे आवाहन मी करीत आहे,’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com