पाणी पळवापळवी : भाजपचे दोन मुख्यमंत्री आमने सामने - Two BJP chief ministers will clash over water issue | Politics Marathi News - Sarkarnama

पाणी पळवापळवी : भाजपचे दोन मुख्यमंत्री आमने सामने

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020


केंद्र सरकारकडूनही कर्नाटकाला झुकते माप देण्यात आले होते.

खानापूर (गोवा) : म्हादईचे पाणी बेकायदा वळविल्याप्रकरणी गोवा सरकारने कर्नाटकविरोधात सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (ता. ६ ऑक्‍टोबर) अवमान याचिका दाखल केली आहे. ही माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विटरद्वारे दिली. म्हादईप्रश्नी पुन्हा एकदा गोव्याच्या न्याय हक्कासाठी तीव्र न्यायालयीन लढा उभारला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे कर्नाटकाचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक सरकारने म्हादईअंतर्गत कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी घिसाडघाई चालविली होती. त्यासाठी लवादाच्या निर्णयानुसार आवश्‍यक परवान्यांसाठी प्रयत्न सुरू होते. केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान खात्यासह जलशक्ती खात्याकडूनही कर्नाटकाला झुकते माप देण्यात आले होते.

अलीकडेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी दोन्ही खात्यांच्या केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्पांना चालना देण्याची मागणी केली होती. केंद्रीय वन खात्यानेच स्वत: पुढाकार घेऊन वृक्षतोडीसाठी पुन्हा अर्ज करण्याची मुभा कर्नाटकला दिली होती. तसेच, विधीमंडळाच्या अधिवेशनात ८८५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देत प्रकल्पांना सुरुवात करण्याची तयारी कर्नाटकने चालविली होती. 

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी (ता. 4) गोव्यात असताना म्हादईप्रश्नी मौन धारण करून गोमंतकीय आणि खानापूर तालुकावासीयांच्या आशेवर पाणी सोडले होते. त्यामुळे गोव्यात विरोधकांनी टीकेची झोड उठविली असतानाच मंगळवारी गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.

लवादाच्या निर्णयाचा अवमान करीत कर्नाटक म्हादईचे पाणी बळजबरीने मलप्रभेत वळवित असल्याचे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेमुळे कर्नाटकाच्या घिसाडघाईला लगाम बसणार आहे. गोवा सरकारच्या या भूमिकेमुळे गोमंतकीयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

लवादाने आदेश देऊनही पाणी वळविणे सुरूच.. 

कर्नाटकने २०१८ पूर्वीच खानापूर तालुक्‍यातील कणकुंबी येथील कळसा प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण केले आहे. म्हादई जलतंटा लवादाने प्रकल्पाला स्थगिती दिली असतानाही कर्नाटकने याबाबत अक्रस्ताळेपणा केला. दोन वर्षांपासून पावसाळ्यात या प्रकल्पातील पाणी मलप्रभेत वळविले जात आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मलप्रभेत करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. लवादाच्या आदेशानुसार कालवा बंद करण्यात आला असला तरी चोर मार्गाने पाणी वळविले जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख