यह बंगाल भाजप है..और यहाँ इनकी पावरी हो रही है... - Trinmool congress criticise bengal bjp over flop rally | Politics Marathi News - Sarkarnama

यह बंगाल भाजप है..और यहाँ इनकी पावरी हो रही है...

वृत्तसंस्था
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

भाजपच्या एका सभेमध्ये स्टेजसमोर केवळ एकच व्यक्ती बसल्याचे दिसत आहे.

कोलकता : सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत असलेल्या 'पावरी हो रही है' या व्हिडिओवरून तृणमूल काँग्रेसने भाजपच्या सभेची खिल्ली उडवली आहे. भाजपच्या बंगालमधील एका सभेमध्ये स्टेजसमोर केवळ एकच व्यक्ती बसल्याचे दिसत आहे. या छायाचित्राचा आधार घेऊन तृणमूल काँग्रेसने भाजपला टोला लगावला आहे.

पाकिस्तानच्या दनानीर मुबीर या तरूणीने सोशल मिडियावर एक व्हिडिओ टाकला आहे. ती आपल्या मैत्रिणींसोबत पार्टी करत असताना एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिची कार आणि मैत्रिणींना दाखविते. पण हे दाखवत असताना पार्टीचा उल्लेख ती पावरी असा करते. 'ये हमारी कार है, ये हम है, और ये हमारी पावरी हो रही है', असे तिने म्हटले आहे.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी तिची खिल्ली तरी उडविलीच पण त्यावरून काहींनी गाणीही तयार केली आहेत. तृणमूल काँग्रेसनेही याच 'पावरी'चा आधार घेत भाजपच्या सभेची खिल्ली उडविली. भाजपच्या एका सभेचे छायाचित्र व्हायरल झाले आहे.

या छायाचित्रामध्ये एका भल्या मोठ्या मैदानावर भाजपची सभा सुरू असल्याचे दिसते. सभेच्या स्टेजवर पाच नेते दिसत आहेत. तर मागील फलकावर सहा-सात नेत्यांचे छायाचित्र आहे. स्टेजच्या समोरही काही मोजक्याच खुर्च्या आहेत. पण केवळ एकच व्यक्ती समोर बसल्याचे दिसत आहे. त्याच्यासमोरच एका वक्त्याचे भाषण सुरू असल्याचे छायाचित्रात दिसते. 

हेही वाचा : काँग्रेस सरकार संकटात, विश्वासदर्शक ठरावाआधीच आणखी एक आमदार फुटला

हेच छायाचित्र ट्विट करून तृणमूल काँग्रेसने भाजपला टोला लगावला आहे. ''यह भाजप बंगाल है, यह उनकी जनसभा है, और यहाँ इनकी पावरी हो रही है,'' असे म्हणत तृणमूलने भाजपची खिल्ली उडविली आहे. त्यानंतर भाजपकडूनही एक व्हिडिओ तयार करून तृणमूलवर पलटवार केला आहे. 

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी हे छायाचित्र ट्विट केले आहे. त्यासाठी त्यांनी '#PThepartyIsOver' हा हॅशटॅग वापरला आहे. तसेच 'स्टेजवर पाच लोक, चित्रात सात नेते. प्रेक्षकांमध्ये एक व्यक्ती. आणि हे केरळमध्येही नाही,' असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. या ट्विटला अनेक नेटकऱ्यांनी लाईक तसेच शेअर केले आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी शरूर यांची विविध छायाचित्र, व्हिडिओ टाकून त्यांची फिरकीही घेतली आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख