'ते' जिवंत सापडण्याची आशा धूसर; आतापर्यंत ५४ मृतदेह हाती... - Total 53 bodies recovered at Tapovan Tunnel in Joshimath | Politics Marathi News - Sarkarnama

'ते' जिवंत सापडण्याची आशा धूसर; आतापर्यंत ५४ मृतदेह हाती...

वृत्तसंस्था
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत तपोवन परिसरात आतापर्यंत ५४ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत.

डेहराडून : हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत तपोवन परिसरात आतापर्यंत ५४ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. आठ दिवसांपासून बचाव कार्य सुरू असून केवळ १५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. अजूनही जवळपास १७९ जण बेपत्ता असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता बेपत्ता असलेल्यांपैकी कोणी बचावले असल्याची शक्यता धूसर होऊ लागल्याने चिंता वाढली आहे.

उत्तराखंड राज्यात चमोली जिल्ह्यातील जोशी मठमधील रेनी गावाजवळ मागील रविवारी हिमकडा कोसळला. त्यामुळे अलकनंदा व धौलीगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचानक मोठ्या प्रमाणावर वाढली. नदीवरील ऋषिगंगा उर्जा प्रकल्पाचे काम सुरू होते. नदीला आलेल्या पूरामुळे हा प्रकल्प उध्वस्त झाला. तपोवन धरणालगत सुरू असलेल्या कामावरील सुमारे २०० हून अधिक मजूर वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात आली.

दुर्घटनेनंतर काही वेळातच बचाव कार्य सुरू करण्यात आले. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस, आपत्कालीन विभागासह विविध यंत्रणा मागील चार दिवसांपासून बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहेत. अनेक अडथळ्यांवर मात करत बचावकार्य करावे लागत आहे. गुरूवारी बोगद्यामध्ये काम करत असलेले जवान काम अर्धवट सोडून बाहेर आले. बोगद्यामध्ये पाणी वाढत असल्याचा अलर्ट दिल्याने काम थांबविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर काही तासांनी पुन्हा काम सुरू झाले.

या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर १५ जणांना वाचविण्यात आले आहे. आणखी १७९ जण बेपत्ता असल्याशी शक्यता आहे. आज तपोवन परिसरात १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले. बचाव पथकांकडून रात्रं-दिवस काम सुरू आहे. 

आठ दिवस होऊनही त्यांचा काहीही संपर्क होत नसल्याने ते जिवंत आढळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तीन-चार दिवस बचावकार्य सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपोवन परिसरातील मोठ्या बोगद्यातील राडारोडा काढण्याचे काम वेगात सुरू आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख