Jitin Prasad
Jitin Prasad

`कॉंग्रेस पक्ष सोडल्याबद्दल जितीन प्रसाद यांचे आभार`

राहुल ब्रिगेडला गळती

नवी दिल्ली  :उत्तर प्रदेशातील नेते जितीन प्रसाद (Jitin Prasad) यांच्या भाजप प्रवेशाला कॉंग्रेसने फारसे महत्त्व देण्याचे टाळले आहे. मात्र बरेच काही देऊनही सोयीचे राजकारण जितीन प्रसाद यांनी केल्याचा आरोप करताना मानसन्मान देऊनही विश्वासघात झाल्याची खवचट प्रतिक्रिया कॉंग्रेसने व्यक्त केली आहे. (Jitin Prasad Joins BJP) 

कॉंग्रेसच्या प्रभावी तरुण नेत्यांच्या फळीतील आश्वासक चेहरा मानला जाणाऱ्या जितीन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशावर कॉग्रेसच्या बड्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र, दुसऱ्या फळीतील नेत्यांनी जितीन प्रसाद यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. छत्तीसगड प्रदेश कॉंग्रेसने तर "कॉंग्रेस पक्ष सोडल्याबद्दल जितीन प्रसाद यांचे आभार”, असे खोचक ट्विट केले.

दैनंदिन वार्तालापादरम्यान कॉंग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी विचारसरणीच्या राजकारणाची आठवण जितीन प्रसाद यांना करून दिली. तसेच हे विचारसरणी आहे की सोईस्कर राजकारण आहे, असा सवालही केला. बरीचशी राज्ये आहेत, जेथे कॉंग्रेस २० वर्षांपासून सत्तेत नाही. तिथेही कॉंग्रेस कार्यकर्ते विचारसरणीसाठी लढत आहेत. हा संघर्ष केवळ खासदार बनण्यासाठी नाही तर आपल्या आणि त्यांच्या (कॉंग्रेसच्या आणि भाजपच्या) विचारसरणीचा आहे, असे सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या. तसेच, जितीन प्रसाद हे समविचारी पक्षात नव्हे तर पूर्णपणे विरोधातील विचारसरणी असलेल्या पक्षात गेले आहेत. आगामी काळात जितीन प्रसाद यांचा कॉंग्रेसच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका राहिली असती. पक्षाने या लोकांना पुढे केले. मंत्रिपद दिले. कॉंग्रेसने बरेच काही दिले असताना हे सोईचे, संधीसाधूपणाचे राजकारण आहे, असा टोलाही प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी लगावला. उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजयसिंह लल्लू यांनी जितीन प्रसाद यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला.

खासदार, दोनवेळा मंत्री, आमदारकीची उमेदवारी एवढा मानसन्मान देऊनही एखादा नेता पक्षाशी एकनिष्ठ राहत नसेल तर हा विश्वासघात नाही तर काय आहे, असा आरोपवजा सवाल अजयसिंह लल्लू यांनी जितीन प्रसाद यांना केला. तसेच कुणाच्याही जाण्याने फरक पडणार नसून कॉंग्रेस विचारसरणीवर चालणारा पक्ष आणि मजबूत स्तंभ आहे, असा दावाही लल्लू यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com