मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट; तौते चक्रीवादळ गुजरातला धडकले, लष्कर सज्ज...

तौते चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं आहे.
TAUKTAE cyclone lies close to Gujarat coast landfall process started
TAUKTAE cyclone lies close to Gujarat coast landfall process started

अहमदाबाद : अरबी समुद्रात तयार झालेलं तौते चक्रीवादळ (Tauktae Cyclone) आता गुजरात किनारपट्टीवर धडकले आहे. पुढील दीड ते दोन तासांत या वादळाचा केंद्रबिंदु किनारपट्टीवर धडकण्याची (LandFall) शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यावेळी ताशी १५५ ते १६५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने गुजरात किनारपट्टीसह लगतच्या जिल्ह्यांना मोठा धोका आहे. त्यासाठी ठिकठिकाणी लष्कराच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकले असले तरी मुंबई, ठाण्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागाला पुढील काही तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. (TAUKTAE cyclone lies close to Gujarat coast landfall process started )

तौते चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं आहे. हे चक्रीवादळ पुढे सरकत असतानाच अधिक तीव्र होत असल्याने गुजरातचा धोका वाढत चालला आहे. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळाच्या Landfall ची प्रक्रिया सुरू झाली असून ती पुढील दोन तास सुरू राहील. त्यामुळे गुजरात किनारपट्टीसह अनेक भागात वेगाने वारे वाहत असून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. किनारपट्टीलगत जवळपास ताशी १५० किमी वेगाने वारे वाहू लागले आहेत. वादळामुळे अनेक भागात पाणी घुसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा गुजरातला बसणार आहे. पोरबंदर व महुवा किनारपट्टीवर हे वादळ धडकणार असून तिथून पुढे राजस्थानच्या दिशेने सरकेल. त्यावेळी या भागातील वाऱ्याचा वेग ताशी 180 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रात 3 ते 4 मीटर उंच लाटा उसळू शकतात. वादळाची तीव्रता वाढत असल्याने धोका लक्षात घेऊन प्रशासनाने किनारपट्टी भागातील 655 गावांमधील सुमारे दीड लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. किनारपट्टीलगतची सर्व घरे रिकामी करण्यात आली आहेत. गुजरातमधील 17 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरामध्ये NDRF च्या 50 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच लष्करालाही सज्ज ठेवण्यात आले आहे. 


23 वर्षांपुर्वी 1173 जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये 9 जून 1998 रोजी कच्छ जिल्ह्यात भयानक वादळ आले होते. या वादळामुळे 1173 जणांचा मृत्यू झाला होता. तर 1774 जण बेपत्ता झाले होते. त्यानंतर आता वर्षांनी तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत असून हे वादळही मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वादळाची तीव्रता पुढे सरकत असताना वाढतच चालली अधिक रौद्र रुप धारण केले आहे.

महाराष्ट्रात सहा जणांचा मृत्यू

तौते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोकणातील हजारो घरांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून अनेक भागात पावसाचे पाणी घुसले आहे. चक्रीवादळ मुंबईच्या जवळून जात असताना ताशी ११४ किमी वेगाने वारे वाहिल्याचे हवामान विभागाने सांगितले. या काळात मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तसेच पुढील काही तास मुंबई, ठाण्यासह काही भागात रेड अलर्ट देण्यात आला असून या काळात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

विमानतळ, सी लिंक बंद

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ दुपारी दोनवाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण वादळाची तीव्रता वाढू लागल्याने आता हे विमानतळ रात्री दहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सी लिंकही वादळाची तीव्रता कमी होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. दक्षता म्हणून महापालिकेने आज लसीकरण केंद्रही बंद ठेवली आहेत.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com