मतदारांना मोफत टीव्ही, मिक्सर, मंगळसूत्रासाठी मोफत सोनं अन् बरंच काही...! - Tamilnadu Government gives subsidies and free gifts to voters | Politics Marathi News - Sarkarnama

मतदारांना मोफत टीव्ही, मिक्सर, मंगळसूत्रासाठी मोफत सोनं अन् बरंच काही...!

वृत्तसंस्था
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

निवडणुका जवळ आल्यानंतर सरकारकडून विविध लोकप्रिय घोषणा केल्या जातात.

चेन्नई : निवडणुका जवळ आल्यानंतर सरकारकडून विविध लोकप्रिय घोषणा केल्या जातात. कल्याणकारी योजना जाहीर करून लोकांना भुरळ घातली जाते. पण प्रत्येकवेळी मतदार त्याला भुलतातच असे नाही. मतदारांचा मूड अनेकदा कळत नाही. परंतु, तमिळनाडूतील सरकार एवढ्यावरच थांबत नाही. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोफत टीव्ही, मोफत तांदूळ, मोफत लॅपटॉप देण्याची या राज्यातील सरकारची खासियत राहिली आहे. 

तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. या राज्यात 234 जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. सध्या राज्यात एआयडीएमके पक्ष सत्तेत आहे. आगामी निवडणुकीसाठी या पक्षासोबत भाजपने युती केली आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर या राज्यात नागरिकांना आकर्षिक करण्यासाठी अनुदान, मोफत वस्तु देण्याची परंपरा राहिली आहे.

अण्णादुराई यांच्या काळापासून निवडणुकांच्या काळात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात होते. विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली जायची. पण करूणानिधी मुख्यमंत्री असताना अनुदानाबरोबर मोफत वस्तु देण्यास सुरूवात झआली. त्यांनी 2006 मध्ये नागरिकांना मोफत रंगीत टीव्हीचे वाटप केले होते. तसेच अनेक योजनांची घोषणा करून डीएमकेला सत्ता मिळवून दिली.

मोफत तांदूळ, मंगळसूत्रासाठी सोनं...

त्यानंतर जयललिता यांनी करूणानिधी यांच्यावरही मात केली. 2011 व 2016 मध्ये त्यांनी अशाचप्रकारे लोकांवर अनुदान व मोफत वस्तुंचा वर्षाव करत सत्ता मिळविली. त्यांनी 2011 मध्ये मोफत तांदूळ, विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मिक्सर, मंगळसूत्रासाठी सोने देण्यासह अनेक घोषणा केल्या होत्या. त्यांनी अम्मा कॅन्टीन, अम्मा मिनरल वॉटर, अम्मा सिमेंट, अम्मा नमक अशा योजना आणून त्यांनी आपली 'कल्याणकारी' अशी प्रतिमा निर्माण केली. 

100 यूनिट वीज मोफत...

2016 च्या निवडणुकीत जयललिता यांनी 100 यूनिट मोफत वीज, मोबाईल आणि दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी महिलांना 50 टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती. यावेळी एआयडीएमके आणि डीएमके या दोन पक्षांमध्येच थेट लढाई होणार आहे. या निवडणुकीतही ही परंपरा कायम राहणार आहे.

गोल्ड लोन माफ...

निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी गोल्ड लोन माफ करण्याची घोषणा केली. सरकारी बँकांद्वारे शेतकरी व गरीबांना दिलेले गोल्ड लोन माफ केले जाईल. काही दिवसांपूर्वी उलेमांना दुचाकी खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्याची तसेच त्यांची पेन्शन दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. तसेच तमिळनाडून वक्फ बोर्डला हज हाऊस उभारण्यासाठी 15 कोटी दिले जाणार आहेत. मागील काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांना डोळ्यासमोर ठेवून अशा अनेक घोषणा केल्या आहेत. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख