मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांनी धुतले कपडे, बनविला डोसा... - tamilnadu assembly elections aiadmk candidate washed clothes voter women | Politics Marathi News - Sarkarnama

मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांनी धुतले कपडे, बनविला डोसा...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मार्च 2021

प्रचाराच्या वेगवेगळ्या क्लृपत्यांसाठी तमिळनाडू ओळखला जातो.

नवी दिल्ली : तमिळनाडू येथे 6 एप्रिल रोजी विधानसभा निवडणूक होत आहे. उमेदवारांच्या प्रचारांनी वातावरण ढवळून निघाले आहे. मतदारांना आकर्षित कऱण्यासाठी वेगवेगळे फंडे, उपक्रम राबविले जात आहेत.  नेहमीच प्रचाराच्या वेगवेगळ्या क्लृपत्यांसाठी तमिळनाडू ओळखला जातो. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवनवीन प्रकार शोधून काढत आहेत. 

निवडणुकीत प्रचारासाठी कोणी रोबोचा वापर करीत आहेत, तर कोणी निवडणूक चिन्हाप्रमाणे कटिंग करत आहेत. तामिळनाडू येथील प्रचारात सध्या दोन उमेदवार प्रामुख्याने चर्चेत आहेत. या दोन्ही उमेदवारांनी निवडणूक प्रचारात केलेल्या कामांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रचार फेरी दरम्यान यातील एका उमेदवारांने कपडे धुतले, तर एका उमेदवाराने डोसा तयार करून उपस्थितांना खाऊ घातला.

 नागापटिन्नम विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा असाच एक अनोखा नमुना पाहावयास मिळाला. अण्णाद्रमुकचे नेते थांगा काथिरावन हे प्रचाराला निघाले असता त्यांनी एका महिलेला कपडे धुताना आणि भांडी घासताना पाहिले. काथिरावन हे स्वत:ला थांबवू शकले नाही आणि त्या महिलेकडून कपडे घेतले आणि रस्त्यावरच कपडे धुतले. तसेच त्या महिलेची काही भांडीही त्यांना यावेळी घासली. काथिरावन म्हणाले, "अण्णाद्रमुकचे सरकार आल्यास महिलांना आणि गृहिणींना हाताने कपडे धुण्याची वेळ येणार नाही." निवडून आल्यानंतर नागरिकांना वॉशिंग मशिन देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. ते कपडे धूत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून ते कपडे धूत असताना त्यांचे समर्थक टाळ्या वाजवित असल्याचे दिसते.  

दुसरा प्रकार वीरुम्भंक्कम मतदारसंघात घडला. वीरुम्भंक्कम मतदारसंघातील द्रमुकचे उमेदवार प्रभाकर राजा हे प्रचार करताना त्यांना रस्त्यालगत डोसा गाडी दिसली. त्यांनी थांबून त्या डोसा गाडीच्या मालकाला बाजूला केले. स्वतः डोसे तयार करून त्यांनी ते उपस्थितांनी खाऊ घातले. तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234  जागांसाठी निवडणूक होत आहे. ता. 6 एप्रिल रोजी पहिला टप्प्यासाठी मतदान होणार आहे. ता. 2 मे रोजी निकाल आहे.

हेही वाचा : भाजप 'तामिळी' नागरिकांचा सन्मान राखत नाही...
तामिळनाडू: तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून वातावरण चांगलेच पेटू लागले आहे. राजकारण्यांकडून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच असल्याचे दिसते. भाजपकडून तामिळनाडूमध्ये तामिळऐवजी हिंदीची सक्ती केली जात असून भाजपकडून तामिळी नागरिकांचा यथोचित सन्मान राखला जात नाही, असा आरोप राज्यसभा काँग्रेस खासदार पी. चिदंबरम यांनी गुरूवारी केला. चिदंबरम म्हणाले, तामिळनाडूची तामिळ ही राज्य भाषा असून तरीही तामिळी जनतेवर तामिळनाडूत हिंदी लादण्याचा प्रताप भाजपकडून करण्यात येत आहे. असे केल्याने तामिळी लोकांचा अपमान भाजपकडून करण्यात आला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख