सुशील कुमार चंद्रा नवे मुख्य निवडणूक आयुक्त... - Sushil Kumar Chandra is the new Chief Election Commissioner | Politics Marathi News - Sarkarnama

सुशील कुमार चंद्रा नवे मुख्य निवडणूक आयुक्त...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

सुशील कुमार चंद्रा हे उद्या पदभार स्वीकारणार आहेत.

नवी दिल्ली: देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुशील कुमार चंद्रा यांची नियुक्ती केली जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उद्या (ता. १३) याबाबतची अधिसूचना काढली जाणार आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांचा कार्यकाल आज संपत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सुशील कुमार चंद्रा हे उद्या पदभार स्वीकारणार आहेत.

सुशील कुमार चंद्रा हे ता. १४ मे २०२२ पर्यंत या पदावर राहतील, त्यांच्या कार्यकाळात गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तरप्रदेश येथील विधानसभा निवडणूक होणार आहेत. सर्वात वरिष्ठ आयुक्त हे मुख्य निवडणूक आयुक्त होण्याच्या परंपरेनुसार केंद्र सरकारने निवडणूक आयोगाकडे या पदासाठी सुशील कुमार चंद्रा यांचे नाव सूचविले आहे. या नावाला राष्ट्रपतींनी मंजूरी दिली आहे. 

चंद्रा यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी ता.१४ फेब्रुवारी २०१९ रोजी निवडणूक आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली होती. निवडणूक आयुक्तपदापूर्वी चंद्रा हे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. 
 
चंद्रा यांच्या कार्यकाळात या राज्यात होणार निवडणूका
नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पुढील वर्षी  गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तरप्रदेश येथील विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुका चंद्रा यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. उत्तरप्रदेश विधानसभेच्या कार्यकाळ पुढच्या वर्षी १४ मे रोजी पूर्ण होत आहे. 

विविध पदावर काम

सुशील कुमार चंद्रा हे १९८० च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रात विविध पदावर काम केले आहे.  सुशील कुमार यांचे शिक्षण देहरादून येथे झाले आहे. त्यांनी विधी शाखेत पदवी घेतली असून ते आंतरराष्ट्रीय करप्रणाली या विषयातील तज्ज्ञ आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख