सुशांत सिंह याची आत्महत्या की अप्रत्यक्ष हत्या..?

सुशांत हा अभिनेता शाहरूख खान आणि अक्षयकुमार सारखा 'आऊटसाईडर' होता. बॅालिवुडमधील काही कळप त्याला चित्रपट मिळू नये म्हणून सारखे प्रयत्नशील असायचे.
Sushant_Singh_Rajput_0_
Sushant_Singh_Rajput_0_

पुणे : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे, पण सुशांतच्या आत्महत्येमागे चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक अपयश असल्याचेही बोलले जाते.  याबाबत अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सुशांतचे काही चित्रपट हिट ठरले होते, पण त्यानंतरही त्यांच्या हातात मोठ्या बॅनरचा एकही चित्रपट नव्हता.  'छिछोरे' सारखा त्यांचा शेवटचा सिनेमा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तरीही या मुंबईच्या माया नगरीमधील अनेक मोठ्या बॅनर, निर्मात्यांनी त्यांच्यावर कळतनकळत बहिष्कार टाकला होता. सुशांत हा अभिनेता शाहरूख खान आणि अक्षयकुमार सारखा  या बॅालिवुडमध्ये 'आऊटसाईडर' होता. बॅालिवुडमधील काही कळप त्याला चित्रपट मिळू नये म्हणून सारखे प्रयत्नशील असायचे, अशीच सध्या चर्चा आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाली असल्याचे त्यांच्या मामांनी आज प्रसारमाध्यमांसमोर बोलतांना सांगितले.  
 
सुशांत याच्या आत्महत्येबाबत चित्रपट अभ्यासक, समीक्षक अमोल मंगेश उद्गीरकर यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.  या पोस्टमध्ये अमोल उदगीरकर म्हणतात, "सुशांतचा पुढचा 'दिल बेचारा' सिनेमापण हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. मला वाटत ही बातमी शेवटचा घाव देणारी ठरली असावी. आउटसाईडर असणं आणि बॉलिवूडमध्ये टिकून राहणं ह्या दोन्ही गोष्टी खूप अवघड असतात. ही जितकी आत्महत्या आहे, तितकीच एक अप्रत्यक्ष हत्या आहे. वाईट झालं..."

कॅाग्रसचे नेते संजय निरूपम यांनी याबाबत एक टि्वट केले आहे. ते म्हणतात, "छिछोरे हिट झाल्यावर सुशांत सिंह राजपूत याने सात चित्रपट साईन केले होते. गेल्या सहा महिन्यात हे सगळे चित्रपच त्यांच्या हातून निघून गेले. यामागील कारण काय आहे ?चित्रपट क्षेत्रातील निष्ठुरता ही एका वेगळ्या मार्गावर काम करते. याच निष्ठुरतेने एका प्रतिभावान कलाकाराचा जीव घेतला आहे. जनअधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांनी सांगितले की सुंशात याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणाची सीबीआय चैाकशी करायला पाहिजे. सुशांत यांचा परिवार आज मुंबईला पोहचला असून दुपारी सुशांतच्या पार्शिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सुशांतचे मित्र निशांत जैन यांनी सांगितले.

 
हेही वाचा : चंदेरी दुनियेला आत्महत्येचा शाप; याआधीही अनेकांनी संपवले जीवन
 
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने बॉलिवूडमधील ताणतणाव आणि नैराश्य हे मुद्दे प्रकर्षाने समोर येऊ लागले आहे. याआधीही अनेक बड्या तारे-तारकांनी जीवन संपविले होते. या निमित्ताने बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेतील दुसरी काळी बाजूही समोर आली आहे.  
 अभिनेत्री जिया खान हिने 'नि:शब्द' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मात्र, नंतर 2013 मध्ये तिने जुहूमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर ती नैराश्यग्रस्त असल्याचे समोर आले होते. बॉलिवूडची एकेकाळची गाजलेली अभिनेत्री दिव्या भारती हिचा 1993 मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडून तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तिने आत्महत्या केली की ती खिडकीतून खाली पडली याचे गूढ अद्याप कायम आहे. कारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना तिचा मृत्यू झाला होता. 

बॉलिवूडला दोन महिन्यांत चौथा धक्का

दक्षिणेकडील चित्रपटात गाजलेली अभिनेत्री सिल्क स्मिता हिने 1996 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आयुष्यात सतत येत असलेल्या अपयशामुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले होते. तिच्या आयुष्यावर बेतलेल्या 'डर्टी पिक्चर'मध्ये विद्या बालन हिने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे पुन्हा एकदा सिल्क स्मिता हे नाव चर्चेत आले होते. 

प्रसिद्ध मॉडेल विवेका बाबजी हिनेही 2010 मध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. करिअरमध्ये आलेले अपयश आणि प्रेमप्रकरणातून आलेले नैराश्य यामुळे तिने आत्महत्या केली होती. याचबरोबर कुलजीत रंधावा या सुपरमॉडेल आणि टीव्ही अभिनेत्रीनेही 2006 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूचे कारणही नैराश्य होते. माजी मिस इंडिया आणि टीव्ही अभिनेत्री नफिसा जोसेफ हिने 2004 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या विवाह होणार होता मात्र, तिच्या होणाऱ्या पतीने त्याचा पहिला विवाह लपवून ठेवला होता. तिला हे कळाल्यानंतर तिला मोठा धक्का बसला होता आणि त्यातूनच तिने हे पाऊल उचलले होते. 

 ख्यातनाम दिग्दर्शक व अभिनेते गुरुदत्त यांनीही 1964 मध्ये आत्महत्या केली होती. झोपेच्या गोळ्या मद्यासोबत घेऊन त्यांनी जीवन संपविले होते. त्यांचे पत्नी गीता दत्त यांच्याशी वाद सुरू होते. यावरून त्यांनी हे पाऊल उचलले होते. 'अमर अकबर अँथनी' आणि 'धरमवीर' यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा 1994 मध्ये इमारतीच्या बाल्कनीतून खाली पडून संशयास्पद मृत्यू झाला होता. एकापाठोपाठ एक चित्रपट अपयशी होऊ लागल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा त्यावेळी होती.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com