महाराष्ट्राला न्याय मिळणार? सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला फटकारले - supreme court asked several questions to central government on vaccination | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्राला न्याय मिळणार? सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला फटकारले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

अनेक मंत्र्यांनी महाराष्ट्रावर लस वाटपाबाबत अन्याय होत असल्याचे भूमिका वारंवार मांडली आहे.

नवी दिल्ली : देशात सुरू असलेल्या लसीकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला फटकारले आहे. लस उत्पादक कंपन्यांनी निश्चित केलेली किंमत, केंद्राने राज्यांना 50 टक्के लशी खरेदी करण्याचे दिलेले अधिकार, केवळ 45 वर्षापुढील नागरिकांना केंद्राकडून मोफत लस, राज्यांना लशीचे वाटप अशी विविध मुद्यांवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारसमोर प्रश्न उपस्थित केले.

देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत एक मेपासून 18 ते 45 वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने लस उत्पादकांकडून थेट राज्यांना 50 टक्के लशींची खरेदी करता येणार असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्यावरून न्यायालयाने नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारकडे 18 ते 45 वयोगटातील नागरिकांची माहिती मागविली आहे.

न्यायालयाने म्हटले की, केंद्र म्हणत आहे की राज्य सरकारे 50 टक्के लशी खरेदी करू शकतात. पण एखाद्या राज्याला दुसऱ्या राज्याच्या तुलनेत लस मिळण्यात अधिक प्राधान्य मिळू शकते का, लस उत्पादक कंपन्या या प्रक्रियेत सर्व राज्यांना समान न्याय कसा सुनिश्चित करतील, असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले आहेत. तसेच न्यायालयाने केंद्र सरकारला 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांची माहिती सादर करण्याचेही आदेश दिले आहेत.

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी महाराष्ट्रावर लस वाटपाबाबत अन्याय होत असल्याचे भूमिका वारंवार मांडली आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या, कोरोना संसर्गाचे प्रमाण पाहता राज्याला लस वाटपात प्राधान्य मिळणे अपेक्षित आहे. पण भाजपच्या राज्यांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही काही मंत्र्यांनी यापूर्वी अनेकवेळा केला आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही लस वाटपाबाबत प्रश्न उपस्थित केल्याने याबाबत केंद्र सरकार नेमकी कोणती भूमिका घेणार, हे लवकरच स्पष्ट होईल. 

चोवीस तासात साडे तीन हजार मृत्यू

देशात मागील चोवीस तासांत 3 हजार 498 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 3 लाख 86 हजार 452 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सुमारे 1 कोटी 87 लाखांवर पोहचला आहे. तर दोन लाखांहून अधिक मृत्यू झाले असून सध्या सुमारे 31 लाख 70 हजार सक्रीय रुग्ण आहेत.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख