सुपरस्टार रजनीकांत यांचा राजकीय डाव?...शशिकला यांच्या तब्येतीची विचारपूस - Superstar Rajinikanth called and enquired Sasikalas health | Politics Marathi News - Sarkarnama

सुपरस्टार रजनीकांत यांचा राजकीय डाव?...शशिकला यांच्या तब्येतीची विचारपूस

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

शशिकला चेन्नईत पोहचल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पहिला फोन सुपरस्टार रजनीकांत यांनी केला.

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला या चार वर्षानंतर तमिळनाडूत परतल्या आहेत. चेन्नईत पोहचल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पहिला फोन सुपरस्टार रजनीकांत यांनी केला, अशी माहिती शशिकला यांचे भाचे व आमदार टी.टी.व्ही.दिनकरन यांनी दिली. त्यामुळे तमिळनाडूमध्ये राजकीय तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. 

सोमवारी सकाळी जयललिता यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून शशिकला बंगळूरमधून तमिळनाडूच्या दिशेने निघाल्या. अण्णाद्रमुकने विरोध करुनही त्यांनी पक्षाचा ध्वज मोटारीवर लावला होता. त्यांच्या समर्थकांनीही हातात पक्षाचे झेंडे घेतले होते. सुरक्षेसाठी तमिळनाडू-कर्नाटक सीमेवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शशिकला यांनी तमिळनाडूत प्रवेश केल्यानंतर समर्थकांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर फुलांची उधळण केली. रस्त्यातच्या दुतर्फा समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांचे स्वागताचे मोठे फलक लावण्यात आले होते. चेन्नईच्या रस्त्यावरही मोठे फलक लावण्यात आले आहेत. कर्नाटक सीमेवरून त्या थेट चेन्नईकडे रवाना झाल्या. सुमारे 24 तासांचा प्रवास करून त्या मध्यरात्री चेन्नईतील घरी पोहचल्या.

रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. पण तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी ही घोषणा मागे घेतली. त्यानंतर आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

चेन्नई पोहचल्यानंतर काही वेळातच रजनीकांत यांचा फोन आल्याचे दिनकरन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, सुपरस्टार यांनी मला फोन करून शशिकला यांच्या तब्येतीची विचारपूस केली. जवळपास 24 तासांचा प्रवास करूनही त्यांची तब्बेत ठीक आहे. 

शशिकला यांच्या उमेदवारीसाठी तज्ज्ञांचा सल्ला
शशिकला या विधानसभा निवडणूक लढवू शकतील किंवा नाही, याबाबतचा सल्ला कायदेतज्ज्ञांकडून घेतला जाणार असल्याचे दिनकरन यांनी सांगितले. तसेच मी स्वत: दोन मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. मी सध्या आमदार असलेला आर. के. नगर मतदारसंघ आणि आणखी एका मतदारसंघाची निवड केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्या बंगळूरमध्ये विश्रांती घेत होत्या.

Edited By Rajanand More

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख