West Bengal Assembly:भाजप उमेदवार  शुभेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर हल्ला ..  - subhendu adhikaris convoy attacked on voting day in nandigram | Politics Marathi News - Sarkarnama

West Bengal Assembly:भाजप उमेदवार  शुभेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर हल्ला .. 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 एप्रिल 2021

 शुभेंदू अधिकारी हे एका मतदान केंद्रावरुन परत येत असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला.

नंदीग्राम (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगाल विधानसभेसाठी आज दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. यामध्ये नंदीग्राम विधानसभेचाही समावेश आहे. येथे तृणमूल कॅाग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तृणमूलकडून भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्या विरोधात रिंगणात आहेत. यामुळे देशभराचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसर्‍या टप्प्यातील मतदान सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दोन्ही राज्यांच्या मतदारांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्या गाडीच्या ताफ्यावर आज हल्ला करण्यात आल्याने काही काळ येथील वातावरण तणावपूर्व होते.  शुभेंदू अधिकारी हे एका मतदान केंद्रावर गेले होते येथून परत येत असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात  शुभेंदू अधिकारी हे थोडक्यात बचावले. पण त्यांच्यासोबत असणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या गाड्याचे नुकसान झाले. 

या हल्ल्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले, ''ही आरपारची लढाई असून यावेळी टीएमसीचा सफाया निश्चित आहे. बंगालला बांगलादेश बनवण्याचा कट रचला जात आहे. टीएमसी एका विशिष्ट समुदायाला फूस लावून राजकीय हिंसाचार घडवत आहे.'' 

बंगालमधील 30 आणि आसाममधील 39 जागांवर आज मतदान होत आहे. बंगालची सर्वात लोकप्रिय जागा असलेल्या नंदीग्रामवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे त्यांचे माजी मित्रपक्ष आणि आता भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्या विरोधात उभे आहेत. निवडणूक पाहता नंदीग्राममध्ये सुरक्षेचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

जय बांग्लाच्या घोषणा देऊन हा हल्ला करण्यात आला. ही घोषणा बंगालची नसून बांगलादेशची आहे. पश्चिम बंगालला बांगलादेश बनवण्याची तयारी सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये जंगलराज सुरू आहे. 
शुभेंदू अधिकारी, उमेदवार, भाजप

Edited by: Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख