चंद्राबाबू नायडूंवर दगडफेक; पोलिसांविरोधात रस्त्यावरच मांडले ठाण - Stones pelted at ex Andhra Pradesh CM Chandrababu Naidu | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चंद्राबाबू नायडूंवर दगडफेक; पोलिसांविरोधात रस्त्यावरच मांडले ठाण

वृत्तसंस्था
सोमवार, 12 एप्रिल 2021

विशेष म्हणजे नायडू यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे.

हैदराबाद : तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे नायडू यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. या घटनेमध्ये पक्षाचा एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. नायडू यांनी घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावरच ठाण मांडले.

आंध्र प्रदेशमध्ये तिरूपती लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. ता. 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून तेलगू देसम पक्षाचा उमेदवारही रिंगणात आहे. या उमेदवाराच्या प्रचारासाठी नायडू यांनी आज मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेतली. पण सभा सुरू असतानाच त्यांच्या दिशेने दगड भिरकावण्यात आले. या घटनेमध्ये नायडू हे थोडक्यात बचावल्या. त्यांना कसलीही दुखापत झाली नाही.

पक्षाच्या कार्यकर्त्याला दगड लागल्याने तो जखमी झाला आहे. या घटनेनंतर नायडू चांगलेच संतापले होते. त्यांनी घटनेनंतर स्टेजवरून खाली येत कार्यकर्त्यांसह थेट रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केले. नायडू यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. एवढी सुरक्षा व्यवस्था असतानाही अशा घटना घडत असतील तर सामान्य नागिरकांना कशी सुरक्षा देणार, असा प्रश्न नायडू यांनी उपस्थित केला.

दरम्यान, पक्षाकडून माजी केंद्रीय मंत्री पनाबाका लक्ष्मी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2019 च्या निवडणूक त्या सुमारे सव्वा दोन लाख मतांनी पराभूत झाल्या होत्या. तर वायएसआर काँग्रेसकडून मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे निकटवर्ती डॅा. मद्दीला गुरू मुर्ती मैदानात आहेत. बल्ली दुर्गाप्रसाद राव यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. मात्र, रेड्डी यांनी राव यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देता अन्य उमेदवार उभा केला आहे. 

काँग्रेस व भाजपनेही या निवडणूक उमेदवार उतरवले आहेत. काँग्रेसकडून माजी खासदार डॅा. चिंता मोहन यांना उमेदवारी मिळाली आहे. तर भाजपने कर्नाटक भाजपचे माजी मुख्य सचिव के. रत्न प्रभा यांना तिकीट दिले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडूनही जोर लावण्यात येत आहे. तर रेड्डी यांनीही हा गड कायम राखण्यासाठी जोरदार प्रय़त्न केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख