स्मृती इराणींनी राहुल गांधींना दिलं आव्हान; म्हणाल्या, 'हिंमत असेल तर...' - Smriti Irani dares Rahul Gandhi to contest election from gujrat | Politics Marathi News - Sarkarnama

स्मृती इराणींनी राहुल गांधींना दिलं आव्हान; म्हणाल्या, 'हिंमत असेल तर...'

वृत्तसंस्था
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

राहुल गांधी यांनी नुकतेच आसाममधील एका सभेत केलेल्या वक्तव्यावरून स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

वांसदा (गुजरात) : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आव्हान दिले आहे. 'हिंमत असेल तर गुजरातमधून निवडणूक लढवावी. तसेच गुजरातमधील चहा व्यावसायिकांच्या खिशातले पैसे काढून दाखवा,' असे आव्हान देत इराणी यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली.

गुजरातमध्ये २१ फेब्रुवारीला सहा महानगरपालिकांच्या तर ८१ नगरपालिका, ३१ जिल्हा परिषदा आणि २३१ पंयायत समित्यांच्या निवडणुका २८ फेब्रुवारीला होणार आहेत. त्यासाठी इराणी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. नवरासी जिल्ह्यातील वांसदा शहरात एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी राहुल गांधींना हे आव्हान दिले.

राहुल गांधी यांनी नुकतेच आसाममधील एका सभेत केलेल्या वक्तव्यावरून इराणी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. गांधी म्हणाले होते की, ''आसाममध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर गुजरामधील चहा मालकांना चहाच्या मळ्यांमधील मजुरांची मजुरी वाढविण्यास सांगितले जाईल.''

याच वक्तव्यावरून बोलताना इराणी म्हणाल्या, ''राहुल गांधी यांनी नुकतेच आसाममधील एका सभेत गुजरातमधील छोट्या चहा व्यावसायिकांच्या खिशातून पैसा काढू, असे वक्तव्य केले आहे. याआधी त्यांना चहा विक्रेत्याची (पंतप्रधान नरेंद्र मोदी) समस्या होती. आता त्यांना चहा पिणाऱ्यांचीही अडचण आहे. मी राहुल गांधींना आव्हान देते. त्यांच्यात हिंमत असेल तर गुजरातमधून निवडणूक लढवावी. त्यांचा सर्व संभ्रम दूर होईल.''

''गुजरात आणि येथील लोकांविषयी काँग्रेसला आधीपासून तिरस्कार आहे. ते नेहमीच पक्षपातीपणा करतात. कारण त्यांच्या राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्टॅच्यु अॉ युनिटी'' च्या उभारणीलाही विरोध होता,'' अशी टीकाही इराणी यांनी केली. 

दरम्यान, स्मृती इराणी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांचा पराभव केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाड मतदारसंघात उभे होते. वायनाडमधून ते विजयी झाले आहेत. २०१४ मध्येही इराणी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात अमेठीतूनच निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख