राजीव सातवांना गुजरातमध्ये हादरा : सर्व आठ जागांवर भाजप विजयी  - Shock to Rajiv Satav in Gujarat: BJP wins all eight seats | Politics Marathi News - Sarkarnama

राजीव सातवांना गुजरातमध्ये हादरा : सर्व आठ जागांवर भाजप विजयी 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

गुजरातमध्ये संघटनात्मक ताकद वाढल्याचे दावे कॉंग्रेसकडून केले जात होते.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसोबत 11 राज्यांमधील विधानसभांच्या 59 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्येही भाजपने 39 जागा जिंकून वर्चस्व कायम राखले आहे. गुजरातमध्येही कॉंग्रेस आमदार फुटून भाजपमध्ये गेल्याने आठ जागांवर निवडणुका झाल्या. या आठही जागा भाजपने खिशात घातल्या आहेत. 

गुजरातमध्ये कॉंग्रेसचे आठ आमदार फुटून भाजपमध्ये गेले होते. त्या आठही जागांवर निवडणुका झाल्या. त्याचा निकाल आज आला. त्या आठही जागा भाजपने जिंकल्या आहेत. गुजरातमध्ये संघटनात्मक ताकद वाढल्याचे दावे कॉंग्रेसकडून केले जात होते.

राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे खासदार राजीव सातव हे कॉंग्रेसचे गुजरात प्रभारी आहेत. मात्र त्यांचीही जादू यंदा गुजरातमध्ये चालू शकली नाही. येथे सत्ताधारी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावून कॉंग्रेसला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. 

दरम्यान, मध्य प्रदेशात हातचे सरकार गमावणाऱ्या कॉंग्रेसला पोटनिवडणुकांमध्येही सत्ता वापसी करता आलेली नाही. तुलनेने ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाने आणि छत्तीसगडमध्ये सत्ताधारी कॉंग्रेसने आपापल्या जागा टिकवून ठेवल्या. मात्र, हरियाना आणि तेलंगणमध्ये सत्ताधाऱ्यांना या पोटनिवडणुकीमुळे धक्का बसला आहे. 

ज्योतिरादित्य गटाचे राज्यमंत्री पराभवाच्या उंबरठ्यावर 

पोटनिवडणुकांमध्ये निकाल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाण्याची परंपरा राहिली आहे. यंदाच्या पोटनिवडणुकाही याला अपवाद राहिलेल्या नाहीत. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी 22 आमदारांसोबत कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कमलनाथ सरकार कोसळले होते. त्यानंतर आणखी कॉंग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामे दिल्याने या सर्व 28 जागांवर पोटनिवडणूक झाली. विद्यमान सत्ताधारी भाजपला सत्ता टिकविण्यासाठी फक्त 8 जागांची आवश्‍यकता होती. परंतु जवळपास 19 जागा भाजपने जिंकल्या आहेत.

अलिकडेच कॉंग्रेसमध्ये दिग्विजयसिंह गटाचे मानले जाणारे आणि अलीकडेच भाजपमध्ये येऊन मंत्रिपद मिळवलेले एदलसिंग कन्साना, ज्योतिरादित्य शिंदे गटाचे राज्यमंत्री गिरिराज दंडोतिया पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत. कॉंग्रेसने 8 जागा राखून शिंदे गटाला धक्का देण्याचा प्रयत्न केला असला तरी या निराशाजनक निकालामुळे नेतृत्वबदलाची मागणी पुढे येऊ शकते. 

कर्नाटक व यूपीत भाजपच 
कर्नाटकमध्येही दोन जागांवर मतदारांनी भाजपला कौल दिला आहे. तर उत्तर प्रदेशात भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारने 7 पैकी पाच जागा राखल्या आहेत, तर दोन जागा जिंकून समाजवादी पक्षाने विधानसभेतील आपले बळ वाढविले आहे. 

नवीनबाबूंची जादू कायम 
झारखंडमध्ये सत्ताधारी जेएमएम कॉंग्रेस आघाडीने दोन्ही जागा जिंकल्या आहेत. ओडिशामध्ये देखील नवीनबाबूंची जादू अजूनही कायम असल्याचे दिसून आले आहे. बिजू जनता दलाने येथील दोन्हीही जागा आपल्याकडेच राखल्या आहेत. मणिपूरमध्ये पाचपैकी भाजपने चार जागा खिशात घालून ईशान्य भारतातही आपली पकड मजबूत असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शेजारच्याच नागलॅन्डमध्ये अपक्षांनी दोन्हीही जागा जिंकल्या आहेत. 

प्रसिद्ध कुस्तीपटू योगेश्वर दत्त चीतपट 
हरियानामध्ये मात्र मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला विधानसभा पोटनिवडणुकीत आपली एक जागा गमवावी लागली आहे. प्रसिद्ध कुस्तीपटू योगेश्वर दत्त हे बरोदा मतदार संघात भाजपचे उमेदवार होते. त्यांना कॉंग्रेसच्या उमेदवाराने चीतपट केले आहे. 

चंद्रशेखर राव यांना झटका 
छत्तीसगडमध्ये एका जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेसने विजय मिळवला. परंतु, तेलंगणमध्ये मात्र के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगण राष्ट्र समितीला झटका बसला आहे. विधानसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत येथे भाजपने विजय मिळवला. 

दरम्यान, बिहारच्या वाल्मिकीनगर लोकसभा मतदार संघाचीही पोटनिवडणूक झाली होती. येथेही नितीशकुमार यांचा करिष्मा कायम राहिला असून जदयूच्या उमेदवाराने कॉंग्रेसचा पराभव केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख