अशीही शिक्षा : मुख्यमंत्र्यांना डास चावल्याने इंजिनिअर निलंबित... - Shivraj singh chouhan madhya pradesh cm shivraj could not sleep due to mosquitoes bite | Politics Marathi News - Sarkarnama

अशीही शिक्षा : मुख्यमंत्र्यांना डास चावल्याने इंजिनिअर निलंबित...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

विश्रामगृहामध्ये डासांमुळे मुख्यमंत्र्यांना रात्रभर झोप लागली नाही.

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना दोन दिवसांपूर्वी एका जिल्ह्याच्या ठिकाणी विश्रामगृहामध्ये मुक्काम करावा लागला होता. पण विश्रामगृहामध्ये डासांमुळे मुख्यमंत्र्यांना रात्रभर झोप लागली नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर विश्रामगृहाच्या इंजिनिअरला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. 

मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यामध्ये नुकताच बस अपघात झाला होता. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सीधी जिल्ह्यात आले होते. त्या रात्री त्यांनी सीधी येथील विश्रामगृहात मुक्काम केला. पण रात्रभर त्यांना डासांशी सामना करावा लागला. त्यामुळे मध्यरात्री अडीच वाजता त्यांच्या खोलीत डास मारण्यासाठी औषध फवारणी करावी लागली. तर पहाटे चार वाजता पुन्हा त्यांची झोपमोड झाली. 

हेही वाचा : उद्योगमंत्री घुसले महिला स्वच्छतागृहात... व्हिडिओ व्हायरल...

विश्रामगृहातील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्याने त्याचा आवाज येऊ लागला. सतत पाण्याचा आवाज येऊ लागल्याने मुख्यमंत्र्यांनी स्वत: उठून मोटर बंद केली. त्यामुळे रात्रभर मुख्यमंत्र्यांची झोप झाली नाही. मुख्यमंत्र्यांना झालेल्या त्रासाची माहिती गुरूवारी मंत्रालयात पोहचली. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर वेगाने सुत्र हलली आणि विश्रामगृहाचे प्रभारी इंजिनिअर बाबूलाल गुप्ता यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. रीवा विभागाचे आयुक्त राजेश कुमार जैन यांनी निलंबनाचे आदेश दिले. 

मुख्यमंत्री चौहान हे विश्रामगृहातील व्हीआयपी खोलीत थांबले होते. दिवसभर मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. तिथून १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंर मुख्यमंत्री ११.३० वाजता विश्रामगृहात पोहचले. तिथेही काही नेते व अधिकारी त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर ते रात्री १२ वाजता आपल्या खोलीत गेले. खोलीमध्ये मच्छरदाणीही नसल्याने मुख्यमंत्र्यांना डासांचा सामना करावा लागला. 

मृतांचा आकडा ५३ वर...

सीधी बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा ५३ वर पोहचला आहे. ही घटना १६ फेब्रुवारीला घडली आहे. प्रवाशांनी भरलेली बस कालव्यामध्ये पडली होती. वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी ही बस दुसऱ्या रस्त्याने चालली होती. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामध्ये मध्यप्रदेश रोड डेव्हलममेंट कॉर्पोरेशनचे विभागीय व्यवस्थापक, अतिरिक्त व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि सीधीच्या आरटीओचा समावेश आहे. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख