काश्मीरच्या ‘वर्तमाना’वर एखादी ‘मन की बात’ करतील का? - shiv sena criticizes on central government kashmir | Politics Marathi News - Sarkarnama

काश्मीरच्या ‘वर्तमाना’वर एखादी ‘मन की बात’ करतील का?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

1971च्या युद्धात आपण पाकड्यांना धडा शिकविला. एका देदीप्यमान विजयाचा ‘इतिहास’ रचला, पण कश्मीरमधील ‘वर्तमाना’चे काय?

मुंबई : पाकिस्तानला धूळ चारत 1971च्या युध्दाचा 50 वा विजय दिवस नुकताच साजरा करण्यात आला. काश्मिरमधील 370 कलम रद्द करण्यात आले. पण जम्मू-कश्मीर धगधगतच राहणार असेल, कश्मीरची सीमा पाकिस्तानच्या गोळीबाराने अशांतच राहणार असेल तर कसे व्हायचे ? 1971च्या युद्धात आपण पाकड्यांना धडा शिकविला. एका देदीप्यमान विजयाचा ‘इतिहास’ रचला, पण कश्मीरमधील ‘वर्तमाना’चे काय? 1971चा इतिहास रचणाऱ्य़ांवर टीका करणारे जरा या वर्तमानावरही एखादी ‘मन की बात’ करतील का?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखात आज विचारण्यात आला आहे. 

या विजयाने पाकिस्तानचा दारुण पराभव करून केवळ इतिहासच घडवला नाही तर पाकिस्तानचे दोन तुकडे करून भूगोलही बदलला. पाकिस्तानचा लचका तोडून बांगलादेश या नवीन राष्ट्राची निर्मिती करून पाकिस्तानला कायमची भळभळती जखम देण्याची महान कामगिरी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बहाद्दर लष्करी अधिकाऱ्य़ांच्या साथीने फत्ते करून दाखवली. ‘काँग्रेसने 70 वर्षांत काय केले?’ असा पोरकट सवाल करणाऱ्य़ा व्हॉटस्ऍप विद्यापीठाच्या वाचाळवीरांनी पाकिस्तानची दोन शकले करण्याचा हा जाज्वल्य इतिहास जरूर डोळय़ाखालून घालायला हवा, असा सल्ला अग्रलेखात देण्यात आला आहे.  

दररोज होणाऱ्य़ा चकमकीत शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव देह त्या त्या राज्यांतील गावात पोहचतात, शोकाकुल वातावरणात तरण्याबांड जवानांवर अंत्यसंस्कार होतात. तिरंग्यात लपेटलेले असे किती पार्थिव देह आपण अजून पाहणार आहोत? 1971च्या युद्धाचा विजय दिवस साजरा करतानाच गरज भासली तर पाकिस्तानवर पुन्हा एकदा तशा युद्धासारखा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्याचा संकल्प आपल्याला करावा लागेल, असे मत आजच्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे.

इंदिरा गांधींच्या मुत्सद्देगिरीची कमाल, अमेरिकेचे आरमार पाकिस्तानच्या मदतीला पोहचण्यापूर्वीच पाकड्यांना पराभूत करण्यासाठी रचलेले धूर्त डावपेच, जनरल माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी लष्कराने चित्त्याच्या चपळाईने पाकिस्तानी सैन्यावर चढवलेला हल्ला आणि अवघ्या 13 दिवसांत पाकड्यांना गुडघे टेकायला लावणारी हिंदुस्थानी सैन्याची जबरदस्त मर्दुमकी अशा जाज्वल्य इतिहासाचा हा सुवर्ण महोत्सव आहे.त्याच युद्धातील विजयाचा गौरव बुधवारी पंतप्रधान मोदी यांनाही केला. अर्थात, पाकिस्तानसारख्या देशाचे शेपूट अशा तडाख्यानंतरही वाकडेच राहिले आहे, हे देखील खरेच, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. 
(Edited  by : Mangesh Mahale)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख