शिवसेनेचा इशारा... बॉलीवूड अन्यत्र हलवण्याचे कटकारस्थान कोणी रचत असेल तर ते उधळून लावू.. - Shiv Sena aggressive in moving Bollywood elsewhere | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचा इशारा... बॉलीवूड अन्यत्र हलवण्याचे कटकारस्थान कोणी रचत असेल तर ते उधळून लावू..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

बॉलीवूडला संपवण्याचे किंवा हे क्षेत्र अन्यत्र हलवण्याचे कटकारस्थान कोणी रचत असेल तर ते उधळून लावू

मुंबई  : मुंबईतील बॉलीवूडच्या केसाला धक्का लागणार नाही. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून हलवण्याइतके ते सोपे नाही. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा हे क्षेत्र अन्यत्र हलवण्याचे कटकारस्थान कोणी रचत असेल तर ते उधळून लावू, असा इशारा 'सामना'च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

बॉलीवूडला संपविण्याचा डाव खपवून घेणार नाही, असा दम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. त्यामुळे ज्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचायला हवा तेथे तो नक्कीच पोहोचला आहे. हिंदी सिनेसृष्टी म्हणजे बॉलीवूडची पाळेमुळे मुंबईत पसरलेली आहेत. गेल्या शंभर वर्षांपासून ही पाळेमुळे मजबुतीने टिकून आहेत. अनेकांचे कष्ट आणि घाम त्या कारणी लागले आहेत; पण सुशांत मृत्यू प्रकरणानंतर काही पोटदुख्यांनी बॉलीवूडविरोधात जी मोहीम सुरू केली आहे ती धक्कादायक आहे, असे 'सामना'तून सष्ट करण्यात आले आहे. 

सिनेमा, मुंबई आणि अर्थकारण यावर या अग्रलेखातून प्रकाश टाकण्यात आला आहे. बॅालीवुड अन्य ठिकाणी हलविण्याऱ्यांना इशारा देण्यात आला आहे.  मुख्यमंत्र्यांनी काल सांगितले की, बॉलीवूडला गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत वेदनादायक आहे.

बॉलीवूडला संपवण्याचे किंवा हे क्षेत्र अन्यत्र हलवण्याचे कटकारस्थान कोणी रचत असेल तर ते उधळून लावू. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत परखडपणे यावर भाष्य केले हे बरे झाले. लॉक डाऊन काळात बॉलीवूडचे काम थंडावले. चित्रीकरणावर बंधने आली. टीव्हीवरील मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले आहे; पण सिने जगतावर आजही मंदीच्या सावल्या आहेत. या क्षेत्रात गुंतवणूक मोठी आह, असे अग्रलेखात म्हटले आहे.

काय म्हटलं आहे  'सामना'च्या अग्रलेखात 

  1. सुशांत राजपूत या कलावंताची आत्महत्या दुर्दैवी आणि धक्कादायक आहे; पण त्याच्या प्रेतावरचे लोणी खाऊन छोटय़ा पडद्यावर जो नंगानाच केला जात आहे तो असह्य आहे. बॉलीवूडचे पाच-दहा प्रमुख लोक येथे बसून पाकिस्तानचा अजेंडा चालवत आहेत असे स्वतःच्या मालकीच्या चॅनेलवरून भुंकले गेले. त्यामुळे संपूर्ण मनोरंजन क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 
  2. विवेक ओबेरॉयच्या घरावर बंगळुरूच्या पोलिसांनी छापा टाकला. विवेकच्या बायकोचा भाऊ हा बंगळुरू ड्रग्ज प्रकरणातला आरोपी आहे. विवेक महाशय हे भाजप गोटातले म्हणून ओळखले जातात व पडद्यावर नरेंद्र मोदी यांची भूमिका विवेक ओबेरॉयने साकारली होती. या सर्व ‘ड्रग्ज’ प्रकरणाशी विवेक ओबेरॉयचा संबंध असेल किंवा आहे असे आम्ही म्हणणार नाही; पण कुठले धागे कुठे पोहोचतील याचा सध्या भरवसा नाही. 
  3. मुळात कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलीवूडच्या केसाला धक्का लागणार नाही. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून हलवण्याइतके ते सोपे नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तर आहेच, पण मनोरंजन उद्योगाचीही राजधानी आहे. मुख्यमंत्र्यांनी या क्षेत्रातील प्रमुख लोकांशी चर्चा केली व त्यांना दिलासा दिला हे योग्यच झाले.  
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख