पुणे : सीरम इन्स्टिट्युटमधील एका इमारतीला लागलेल्या आगीमुळे संस्थेचे तब्बल एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच आग लागलेल्या इमारतीचा वापर बीसीजी, रोटा व्हायरस व अन्य काही लशींच्या उत्पादनासाठी केला जाणार होता. पण आगीमुळे झालेल्या नुकसानीमुळे या लशींच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूटला गुरूवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीमध्ये पाच मजुरांचा मृत्यु झाला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी संस्थेला भेट देऊन आग लागलेल्या इमारतीची पाहणी केली. त्यांच्यासोबत संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला व मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला हेही होते. पाहणीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना लशीची निर्मिती होत असलेला प्रकल्प आग लागलेल्या इमारतीपासून दूर आहे. त्यामुळे या लशींचा साठा सुरक्षित आहे. आगीच्या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. चौकशी अहवाल आल्यानंतरच हा घातपात होता की अपघात होता याचा निष्कर्ष काढता येईल. मृत्युमुखी पडलेल्यांची संपुर्ण जबाबदारी संस्थेने घेतली आहे. गरज भासल्यास त्यांना सरकारकडूनही मदत केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पूनावाला यांनी आगीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली. कोरोना लस साठविलेल्या ठिकाणाचे काहीही नुकसान झालेले नाही. भविष्यामध्ये बीसीजी व अन्य लशींचे उत्पादन वाढविण्यासाठी या इमारतीचे काम सुरू कऱण्यात येत होते. तीन-चार मजल्यांचे नुकसान झाले आहे. अतिरिक्त सुविधा निर्माण केल्या जात होत्या. त्याचेच काम सुरू होते.
याठिकाणी सध्या कोणत्याही लशीचे उत्पादन सुरू नव्हते. त्यामुळे लशींचे नुकसान झालेले नाही. मात्र, इतर नुकसान जवळपास 1 हजार कोटी रुपयांचे आहे. तसेच भविष्यामध्ये बीसीजी, रोटा व्हायरस व अन्य लशींच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Edited By Rajanand More

