राम मंदिरासाठी निधी न देणाऱ्यांच्या घरांवर वेगळ्या खुणा; कुमारस्वामींचा आरएसएसवर आरोप... - Separate markings on houses of non-funders for Ram temple says kumarswami | Politics Marathi News - Sarkarnama

राम मंदिरासाठी निधी न देणाऱ्यांच्या घरांवर वेगळ्या खुणा; कुमारस्वामींचा आरएसएसवर आरोप...

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी निधी संकलित करण्यावरून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी टीका केली आहे.

बेंगलुरू : अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी निधी संकलित करण्यावरून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) टीका केली आहे. 'राम मंदिरासाठी निधी देणारे आणि न देणाऱ्यांच्या घरांवर वेगळ्या खुणा केल्या जात आहे. जर्मनीमध्ये हिटरलच्या काळात नाझींनी असंच केलं होतं. जर्मनीत नाझी पक्ष स्थापन झाला, त्याचवेळी भारतात आरएसएसचा जन्म झाला,' असे ट्विट कुमारस्वामी यांनी केले आहे.

अयोध्येतील राम मंदिरासाठी देशभरातून निधी जमा केला जात आहे. यावरूनच कुमारस्वामी यांनी ही टीका केली आहे. एवढ्यावरच न थांबता कुमारस्वामी म्हणाले, ''आरएसएसचा जन्म जर्मनीत नाझी पक्षाची स्थापना झाली त्याचवेळी झाला आहे. आरएसएस नाझींप्रमाणेच धोरण अवलंबणार असेल तर काय होईल, ही चिंता आहे. देशात आता लोकांचे मुलभूत अधिकार हिसकावून घेतले जात आहेत. देशात अघोषित आणीबाणी आहे. लोक आपले विचार खुलेपणाने व्यक्त करू शकत नाहीत.''

माध्यमांच्या स्वातंत्र्यावर साशंकता व्यक्त करताना कुमारस्वामी म्हणाले, ''माध्यमे सरकारचे विचार मांडू लागले तर काय होईल? पण सद्यस्थितीवरून असे दिसते की देशात काहीही होऊ शकते. अशा घटनांमुळे देश कुठे जाईल?'' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, कुमारस्वामी यांच्या ट्विटबाबत आरएसएसचे माध्यम प्रभारी ई. एस. प्रदीप यांना विचारले असता ते म्हणाले, ''कुमारस्वामींच्या वक्तव्य उत्तर देण्याच्या लायकीची नाहीत.''

निधी संकलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा म्हणाले, देशात १५ जानेवारीपासून निधी समर्पण अभियान राबविले जात आहे. सर्व समाजातून व्यापक स्वरूपात यामध्ये सहभाग मिळत आहे. राम मंदिर उभारणीसाठी मिळत असलेले चांदीचे दान ठेवण्यासाठी जागा नसल्याचे मिश्रा यांनी सांगितले. 

बँकेचे लॉकर भरले आहेत. त्यामुळे चांदीचे दान घेणे बंद करावे लागले होते. पण याची जेव्हा गरज लागेल, तेव्हा मंदीर उभारणीत त्याचा वापर केला जाईल. चांदी ठेवण्याची अडचण असल्याने ते दान स्वरूपात देऊ नये, असे आवाहन मिश्रा यांनी केले आहे. भविष्यात त्याची गरज भासल्यास आवाहन केले जाईल, असेही ते म्हणाले.

Edited By Rajanand More 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख