भाजपचा नेता म्हणाला, "राहुल गांधींना शाळेत पाठवा..."  - Send Rahul Gandhi to school Giriraj Sinh asked speaker in Loksabha | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचा नेता म्हणाला, "राहुल गांधींना शाळेत पाठवा..." 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 मार्च 2021

गिरीराज सिंह यांनी आज लोकसभेत राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. 

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी २ फेब्रुवारी रोजी पुदुच्चेरी आणि कोचीनमध्ये जाऊन "देशात मत्स्यपालन विभागच नाही, मी सरकारमध्ये आलो तर एक स्वतंत्र मंत्रालय बनवेल," असे वक्तव्य केलं होतं. या व्यक्तव्यावरून मत्स्यपालन विभागाचे मंत्री गिरीराज सिंह यांनी आज लोकसभेत राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. 

राहुल गांधी यांनी मत्स्यपालनासाठी एका वेगळ्या मंत्रालयाची मागणी केली होती. "मच्छिमारांसाठी एका स्वतंत्र आणि समर्पित मत्स्यपालन मंत्रालयाची आवश्यकता आहे. मंत्रालयात केवळ एका विभागाची नाही…" असं ट्विट काही दिवसांपूर्वी त्यांनी केलं होते. स्वतंत्र मत्स्यपालन मंत्रालय बनवण्याच्या राहुल गांधी यांच्या मागणीवर गिरीराज सिंह यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मत्स्यपालन क्षेत्राबाबत आज लोकसभेत चर्चा सुरू होती. खासदार सुनिता दुग्गल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गिरीराज सिंह म्हणाले, "लोकसभेत राहुल गांधी यांनीच मत्स्यपालन विभागाशी संबधीत प्रश्न विचारला होता. आणि काही दिवसानंतर ते स्वतःच विसरून गेले की देशात असा विभाग आहे. राहुल गांधी यांची स्मरणशक्ती कमकुवत झाली की आणखी काय झाले मला माहित नाही. राहूल गांधी यांच्या वक्तव्यामुळे मला धक्का बसला आहे. केंद्र सरकारचे कोणकोणते विभाग काम करीत आहेत, याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी यांना शाळेत पाठवा." 
 
ते म्हणाले की, काँग्रेसने २०१४ पर्यंत अनेक पिढ्या राज्य करूनही केवळ ३६८२ कोटी रुपये वाटप करण्यात आले. मोदी सरकारने मात्र सहा वर्षांत ३२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मोदीजींनी २०१९ मध्ये दोन विभाग बनवले होते, हे राहुल गांधींना माहितच नाही की मस्त्यपालन विभाग कुठे आहे? त्याना शाळेत पाठवा… त्यांना सांगा की भारतात कोणकोणते विभाग काम करीत आहेत. काँग्रेसने मत्स्यपालन क्षेत्राची अवस्था बिकट ठेवल्याचा आरोप गिरीराज सिंह यांनी केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख