भारतात तुटवडा अन् अमेरिकेत अॅस्ट्राझेनेका लशीचे चार कोटी डोस पडून - Send AstraZeneca Vaccine To India says raja krishnamurthy to jo biden | Politics Marathi News - Sarkarnama

भारतात तुटवडा अन् अमेरिकेत अॅस्ट्राझेनेका लशीचे चार कोटी डोस पडून

वृत्तसंस्था
रविवार, 25 एप्रिल 2021

भारतात सध्या अॅस्ट्राझेनेकाची सिरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर होत आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात लसीकरण वेगात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतात सध्या अॅस्ट्राझेनेकाची सिरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर होत आहे. पण लशींच्या तुटवड्यामुळे देशभरातील अनेक केंद्र बंद ठेवावी लागत असल्याची स्थिती आहे. सुरूवातीच्या काळात भारताकडून अनेक देशांना लशींचा पुरवठा करण्यात आला. तर दुसरीकडे एकट्या अमेरिकेत सध्या तब्बल चार कोटी डोसचा साठा आहे. 

भारतामध्ये आतापर्यंत एकूण 14 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये फ्रंटलाईन कर्मचारी आणि 45 वर्षांपुढील नागरिकांचा समावेश आहे. मागील 99 दिवसांमध्ये भारताने हा टप्पा गाठला आहे. देशात 60 वर्षांपुढील 77 लाखांहून अधिक नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर जवळपास पाच कोटी नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. भारताने कमी कालावधीत हा टप्पा गाठला असला तरी सध्या लशींचा तुटवडा जाणवत आहे. 

भारतीय वंशाचे अमेरिकेच्या संसदेचे सदस्य राजा कृष्णमुर्ती यांनी भारताच्या मदतीसाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडन यांना आवाहन केले आहे. अमेरिकेमध्ये सध्या अॅस्ट्राझेनेकाच्या लशीचे जवळपास 4 कोटी डोसचा साठा आहे. सध्या त्याचा वापर होत नाही. मेक्सिको आणि कॅनडासाठी त्याचा वापर सुरू करण्यात आल्याचे कृष्णमुर्ती यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी हा साठा भारतासह अर्जेंटिना व इतर देशांना देण्याची मागणी केली आहे.

जगातील कोरोना विषाणुचा संसर्ग रोखणे, लोकांचे आरोग्य आणि जागतिक अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी हा साठा आता खुला करायला हवा. त्यामुळे बिडेन प्रशासनाने तातडीने हा साठा सर्वाधिक धोका पोहचलेल्या देशांसाठी खुला करावा, अशी विनंती कृष्णमुर्ती यांनी केली आहे. 

दरम्यान, भारताने नुकतीच स्पुटनिक व्ही या लशीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. मात्र, ही लस प्रत्यक्ष नागरिकांना मिळण्यासाठी जून महिना उजाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच केंद्र सरकारकडून अन्य लशींना भारतात परवानगी देण्याबाबत प्रयत्न केले जात आहेत. सध्या देशात दोनच लशींचा वापर होत असल्याने मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख