Secret meeting of disgruntled MLAs; Next decision soon
Secret meeting of disgruntled MLAs; Next decision soon

मोठी घडामोड : नाराज आमदारांची गुप्त बैठक; पुढील निर्णय लवकरच   

बैठकीत पुढील दिशा काय असावी, यावर चर्चा झाल्याचे समजते.

बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या असंतुष्ट आमदारांची गुप्त बैठक आमदार रमेश जारकीहोळी यांच्या निवास स्थानी शुक्रवारी (ता. ६ ऑगस्ट) रात्री पार पडल्याचे समजते. काँग्रेस-धजदमधून भाजपमध्ये आलेले आमदार या बैठकीला उपस्थित होते. मंत्रिपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करून बैठकीत पुढील दिशा काय असावी, यावर चर्चा झाल्याचे समजते. (Secret meeting of disgruntled MLAs; Next decision soon)

आक्षेपार्ह सीडी प्रकरणात अडकल्याने रमेश जारकीहोळी यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ते या प्रकरणातून आपली निर्दोष मुक्तता होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. परंतु तोपर्यंत भालचंद्र जारकीहोळी यांना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी त्यांनी भारतीय जनता पक्षासमोर ठेवली होती. परंतु पक्षश्रेष्ठींनी दोन्ही जारकीहोळी बंधूंकडे दुर्लक्ष करून त्यांना मंत्रिमंडळापासून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे असंतुष्ट आमदारांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांच्या नेतृत्वाखाली काही जण, अरविंद बेल्लद, नेहरू ओलेकर यांच्या नेतृत्वाखाली काही जण, तर रमेश जारकीहोळी यांचे बंधू भालचंद्र जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काही जणांनी स्वतंत्रपणे नाराजी व्यक्त करून सरकारपासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

मुख्यमंत्री बोम्मई यांच्या जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार नेहरु ओलेकर यांनीही मंत्रीपद न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लवकरच पुढील निर्णय घेण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. त्याचप्रमाणे भालचंद्र जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी, श्रीमंत पाटील, राजू गौड व इतरांनी सुद्धा आपणास मंत्रिमंडळातून वगळल्याबद्दल आक्रोश व्यक्त केला. येडीयुराप्पा यांचे पक्षांतर्गत विरोधक व बंडखोर आमदार म्हणून ओळखण्यात येणारे अरविंद बेल्लद, सी. पी, योगेश्वर, बसवराज पाटील यत्नाळ यांनीसुद्धा बोम्मई यांच्या सरकार विरुद्ध असमाधान व्यक्त केले आहे.

सध्या मंत्रिमंडळात केवळ चार जागा शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत पुढील दिशा कोणती असावी, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या घाईने कोणताच निर्णय न घेता काही दिवस प्रतीक्षा करणेच योग्य होईल, असे मत काही आमदारांनी बैठकीत व्यक्त केले. परंतु मुख्यमंत्री व पक्षावर दबाव आणण्याचे काम सतत चालू ठेवावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com