शाळा बंद झाल्याने चारशे अब्ज डॉलरचे नुकसान ! - School closures cost 400 billion | Politics Marathi News - Sarkarnama

शाळा बंद झाल्याने चारशे अब्ज डॉलरचे नुकसान !

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

हा फटका साधारणपणे चारशे अब्ज डॉलरच्या घरात असू शकतो, असे जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गामुळे देशभर लॉकडाउन लागू करण्यात आल्याने याचे शिक्षण व्यवस्थेवर देखील दूरगामी परिणाम झाले आहेत. सर्वच भागांतील शाळा दीर्घकाळ बंद राहिल्याने देशाला याची मोठी आर्थिक किंमत देखील मोजावी लागू शकते.

केवळ शाळा बंद राहिल्याने दक्षिण आशियातील देशांना ६२२ अब्ज डॉलरच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. परिस्थिती आणखीनच चिघळली तर हे नुकसान ८८० अब्ज डॉलरच्या घरामध्ये जाऊ शकते. प्रादेशिक पातळीवर भारताला याचा सर्वाधिक फटका बसणार असून अनेक देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये यामुळे मोठी घसरण होऊ शकते अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. 

‘बिट ऑर ब्रोकन? इन्फॉर्मेलिटी अँड कोव्हिड-१९ इन साऊथ एशिया’ या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. दक्षिण आशिया २०२० मध्ये आतापर्यंतच्या सर्वांत वाईट मंदीला सामोरे जाणार असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. 

अध्ययनाचा प्रश्न गंभीर 
सध्या शाळा बंद असल्याने मुलांवर असंख्य बंधने येत आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही पातळ्यांवर ३९१ दशलक्ष मुले शाळेपासून दुरावली आहेत, यामुळे त्यांच्या अध्ययनाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अनेक देशांनी मुलांना कोरोना काळात शिक्षण देण्याचा प्रयत्न केला खरा पण दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोचणे शक्य झालेले नाही. कोरोनामुळे ५.५ दशलक्ष मुले ही शिक्षण व्यवस्थेपासून दुरावली असल्याची शक्यता या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. 

अहवाल सांगतो 
पाच महिने शाळा बंद राहिल्याने मुले अभ्यास करणे विसरली 
मुलांचे ५ वर्षांपर्यंतचे शैक्षणिक नुकसान 
शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँकेकडून लेज पद्धती 
शैक्षणिक वर्षांची संख्यात्मक वाढ आणि गुणवत्ताविकासावर भर 
प्रत्येक मूल त्याच्या आयुष्यातील ४,४०० हजार डॉलरचे उत्पन्न गमावेल 

कोरोना २८ दिवस जिवंत राहतो 
कोरोनाचा विषाणू सर्वसामान्य पृष्ठभाग, स्मार्टफोन, स्टील, चलनी नोटा आणि काच यांच्यावर २८ दिवस जिवंत राहू शकतो, असा दावा ऑस्ट्रेलियातील नॅशनल सायन्स एजन्सीने केला आहे.

व्हायरोलॉजी जर्नल या नियतकालिकात हे संशोधन विस्ताराने प्रसिद्ध करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धूत राहणे आणि पृष्ठभाग स्वच्छ करत राहणे, हात एकमेव मार्ग असल्याचा दावाही संशोधकांकडून करण्यात आला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख