चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला या आज चार वर्षानंतर राज्यात परतल्या आहेत. तमिळनाडू-कर्नाटक सीमेवर समर्थकांनी फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. दरम्यान, मनाई करूनवाहनाला अण्णाद्रमुकचा झेंडा लावल्याने शशिकला यांनी विरोधकांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्या कर्नाटकमध्ये विश्रांती घेत होत्या.
Supports of expelled AIADMK leader VK Sasikala gather in large number to celebrate her arrival in Tamil Nadu, from Bengaluru where she was staying after being discharged from hospital pic.twitter.com/C8Ev6eI0pH
— ANI (@ANI) February 8, 2021
सोमवारी सकाळी जयललिता यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्या कर्नाटकातून निघाल्या. तमिळनाडूतील सत्ताधारी पक्षाने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यामुळे त्यांनी पक्षाचा झेंडा वापरू नये, अशी ताकीद देण्यात आली होती. पण त्यानंतरही वाहनाला पक्षाचा झेंडा लावूनच त्या निघाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या समर्थकांनीही हातात पक्षाचे झेंडे घेतले होते.
सुरक्षेसाठी तमिळनाडू-कर्नाटक सीमेवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही वेळापूर्वीच त्यांनी तमिळनाडू राज्यात प्रवेश केला. यावेळी सीमेवर समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. तमिळनाडूत प्रवेश केल्यानंतर समर्थकांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर फुलांची उधळण केली. रस्त्यातच्या दुतर्फा समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांचे स्वागताचे मोठे फलक लावण्यात आले होते. चेन्नईच्या रस्त्यावरही मोठे फलक लावण्यात आले आहेत. तमिळनाडू सीमेवरून त्या थेट चेन्नईकडे रवाना झाल्या.
वादाचा शेवट गोड होईल का?
शशिकलांचे भाचे व अम्मा मक्कल मुनेत्र कळघम पक्षाचे सरचिटणीस आमदार दिनकरन यांनी वादाचा शेवट गोड होईल, असे सांगत काही दिवसांपुर्वी सुचक वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, शशिकला या तमिळनाडूत परतल्यानंतर अण्णाद्रमुकशी असलेल्या वादाचा शेवट गोड होईल. शशिकला या विधानसभा निवडणूकही लढवतील. याचबरोबर शशिकला याच अण्णाद्रमुकचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवतील. अण्णाद्रमुकसोबतचा आमच्या वादाचा शेवट झाल्यानंतर राज्यात द्रमुक सत्तेवर येणार नाही. द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांचे सत्तेवर येण्याचे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत.
शशिकला यांना चार वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. त्यामुळे त्यांना शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यापासून पुढे सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी आहे. असे असतानाही त्या निवडणूक कशी लढवणार, हे दिनकरन यांनी स्पष्ट केलेले नाही. याचबरोबर अण्णाद्रमुकशी समझोता होण्याबाबत नेमकी काय चर्चा झाली अथवा कोणता तोडगा निघाला यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, त्यांच्या या विधानामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
तमिळनाडूमध्ये बदलणार राजकीय समीकरणे?
शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.
शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

