अण्णाद्रमुकचे नेते बालिश! शशिकलांची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल - Sasikala criticize AIDMK leaders on telephonic coversetion with party workers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

अण्णाद्रमुकचे नेते बालिश! शशिकलांची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 जून 2021

अण्णाद्रमुकमधील नेते सतर्क झाले असून पदाधिकाऱ्यांना शशिकलांशी बोलण्यासही मनाई करण्यात आली आहे.

चेन्नई : तमिळनाडूच्या (Tamilnadu) राजकारणात व्ही. के. शशिकला यांच्या पुनरागमानाच्या चर्चा सुरू असतानाच त्यांची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये त्या थेट अण्णाद्रमुकच्या नेत्यांवर शरसंधान साधत आहेत. एमजीआर यांच्या पावलावर पाऊल टाकत आता हे नेते काम करत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच हे नेते बालिश असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. (Sasikala criticize AIDMK leaders on telephonic coversetion with party workers)

काही दिवसांपूर्वी शशिकला यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली होती. यामध्ये त्या कार्यकर्त्यांना आपण परत येणार असल्याचे म्हणाल्या आहेत. त्यामुळं अण्णाद्रमुकमधील नेते सतर्क झाले असून पदाधिकाऱ्यांना शशिकलांशी बोलण्यासही मनाई करण्यात आली आहे. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शशिकलांशी बोलणाऱ्या 16 पदाधिकाऱ्यांना आज थेट पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पक्षाचे प्रवक्त्यांनाही पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत हकालपट्टी करण्यात आली. 

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांचा संभाजीराजेंसाठी ट्रॅप! प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

या कारवाईनंतर आणखी एक ऑडिओ क्लिप बाहेर आल्याने अण्णाद्रमुकमध्ये खळबळ उडाली आहे. या क्पिपमध्ये कार्यकर्त्याशी बोलताना शशिकला म्हणतात की, नेते स्वार्थीपणा करत आहेत. सध्याचे नेतृत्व एमजीआर यांच्या पावलावर पाऊल टाकत नाही. जे एमजीआरला आदर्श मानतात ते कधीच चुकीचे करू शकत नाहीत. एमजीआर आणि अम्मा (जयललिता) यांच्या काळात राज्यातील सर्व भागातून पक्षाला मतं मिळाली. कोणतीही जात किंवा समाजामध्ये कधीही भेदभाव केला नाही. पण काही नेते पक्षाचं नाव खराब करत आहेत. ही काळजीची बाब असल्याचे शशिकला म्हणतात.

दरम्यान, या क्लिपनंतर अण्णाद्रमुकने त्यांच्या विरोधात ठराव केला आहे. शशिकला यांच्याकडून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. त्या सध्या पक्षाच्या सदस्यही नाहीत, असे या ठरावात म्हटले आहे. अण्णाद्रमुकच्या विलुपूरम जिल्हा समितीने हा ठराव केला आहे. शशिकला या ब्रिटाशींची फोडा आणि राज्य करा हे रणनीती अवलंबत आहेत. मात्र, त्याचा पक्षावर परिणाम होणार नाही, असे अण्णाद्रमुकचे नेते डी. जयाकुमार यांनी सांगितले. 

हेही वाचा : वाहनचालकांना मोठा दिलासा; कागदपत्रांची मुदत संपली असल्यास काळजी करू नका!

पक्षाच्या कार्यकारिणीच्या या कठोर निर्णयामुळे पक्षात खळबळ उडाली आहे. शशिकला यांनी फोनवरून साधलेला संवाद एक नाटक असल्याचे पक्षाने म्हटले आहे. शशिकला या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्ती सहकारी आहेत. त्यांचे पक्षामध्ये अनेक समर्थकही आहेत. त्यामुळे अण्णाद्रमुकमधील नेत्यांमधील अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे. कोरोना महामारी संपल्यानंतर पुन्हा राजकारणात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. 

कोण आहेत शशिकला?

जयललिता यांच्या निधनानंतर शशिकलांनी पनीरसेल्वम यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. 

शशिकलांच्या सुटकेनंतर त्यांना पक्षात न घेण्यास तत्कालीन मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि ओ.पनीरसेल्वम यांचा सर्वांत जास्त विरोध होता. काही दिवसांपूर्वी पनीरसेल्वम यांनी शशिकलांना पुन्हा एकदा पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. यामागे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष अडचणीत आल्याचे कारण आहे. मात्र, शशिकलांनी याला कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. तसेच निवडणुकीपुर्वीच त्यांनी राजकारणातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. पण त्या पुन्हा सक्रीय झाल्याचे ऑडिओ क्लिपवरून स्पष्ट होत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख