सायरा बानो यांचा भाजपमध्ये प्रवेश... - Saira Bano join BJP | Politics Marathi News - Sarkarnama

सायरा बानो यांचा भाजपमध्ये प्रवेश...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

उत्तराखंड भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बंशीधर भगत यांनी सायरा बानो यांचे स्वागत केले आहे. 

नवी दिल्ली :  उत्तराखंड राज्यातील काशीपूर येथील रहिवासी असलेल्या सायरा बानो यांनी तीन तलाक, बहुविवाह आणि निकाह हलाला यांच्यावर बंदी घालण्याची मागणी सर्वात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात केली होती. २०१६ मध्ये त्यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याची दखल घेत न्यायालयानं तीन तलाकला घटनाबाह्य ठरविले होते. 

सर्वोच्च न्यायालयाने  २०१७ मध्ये सायरा बानो यांच्या याचिकेवर निकाल दिला होता. त्यानंतर २०१९ मध्ये तीन तलाकचा प्रश्नावर संसदेत चर्चा करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने २०१९ मध्ये तीन तलाकच्या विरोधात कायदा केला. तीन तलाक देणे हा कायदेशीर गुन्हा ठरला. आता तीन तलाक हा अजामीनपात्र गुन्हा ठरला आहे. या सायरो बानो यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. उत्तराखंड भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बंशीधर भगत यांनी सायरा बानो यांचे पक्षामध्ये स्वागत केले आहे. 

सायरा बानो यांनी तीन तलाकच्या विरोधात पहिल्यांदा आवाज उठविला होता. त्यांनी याप्रकरणी न्यायालयीन लढा दिला होता. भारतीय जनता पक्षाने दाखविलेल्या धाडसामुळे तीन तलाकच्या नरकातून मुस्लिम महिलांची सुटका झाली. त्यामुळे लाखो मुस्लिम महिला सन्मानाचे आयुष्य जगू लागल्या आहेत. यामुळेच सायरा बानो यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असल्याचे समजते.  

अलाहाबाद येथील एका प्रॉपर्टी डिलरबरोबर २००२ मध्ये सायरो बानो यांचा विवाह झाला होता. पण, संसारात सायरा यांच्या वाट्याला दुःख आले. पतीकडून मारहाण व छळ होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यातून पतीने एका दिवशी तारेनं सायरा बानो यांना तलाकनामा पाठवून दिला होता. याबाबत सायरा बानो यांनी दाद मागितली. पण तारेनं पाठविलेला तलाकनामा वैध असल्याचे त्यांना सांगणयात आले. सायरा बानो यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली होती. 
 

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांचा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांवर गंभीर आरोप...  
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांवर गंभीर आरोप केले आहे. याबाबत जगनमोहन रेड्डी यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना पत्र लिहिले आहे. थेट सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशावर अशाप्रकारे पक्षपातीपणाचा आरोप राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून केल्या जाण्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर येत आहे. न्यायव्यवस्थेवर जगनमोहन सरकारने थेट हल्ला चढवला आहे. सुप्रीम कोर्टातील दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश एन वी रमन्ना, माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत त्यांनी आठ पानांचे पक्ष बोबडे यांना लिहिले आहे.   

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख