डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये प्रफुल्ल पटेल यांचे नाव...

भाजपच्या त्रासाला कंटाळून खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली असावी, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाआहे.
ss42f.jpg
ss42f.jpg

मुंबई : ''खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजपचे गुजरातचे माजी मंत्री आणि सध्याचे दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव आहे. यातूनच भाजपच्या त्रासाला कंटाळून खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली असावी,'' असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.   

''सातवेळा खासदार असणा-या मोहन डेलकर यांना इतके असहाय आणि विवश व्हावे लागले की त्यांनी आपले जीवनच संपवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड वर्षापासून आपल्यावरील प्रचंड मोठ्या दबावाची आणि छळवणुकीची गाथा त्यांनी स्वतःच व्हिडीओद्वारे तसेच संसदेमध्ये भाषणातूनही मांडली होती. त्यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात भाजप नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला होता तसेच त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपचे गुजरातचे माजी मंत्री आणि सध्याचे दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले आहे. यातूनच भाजपच्या त्रासाला कंटाळून खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली असावी,'' असा आरोप  सचिन सावंत यांनी केला आहे.

 मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा, म्हणून डेलकरांची मुंबईत येऊन आत्महत्या केली असून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने डेलकरांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून डेलकर कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. डेलकर यांच्या आत्महत्याप्रकरणी भाजपच्या भूमिकेची चौकशी करणार असल्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला ऑनलाईन मिटींगमध्ये दिले आहे. 

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना सावंत म्हणाले की, एका खासदाराला खोट्या केसेसमध्ये अडकवणे त्यांना व त्यांच्या समर्थकांना छळणे तसेच नोकरशाही, पोलिस, तपासयंत्रणा आणि स्थानिक गुंडाकडूनही त्यांची छळवणूक होणे याबाबत त्यांनी स्वतः व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली होती. मला तुम्ही हा त्रास का देता अशी विचारणा त्यांनी केल्यावर उपरसे ऑर्डर है असे उत्तर त्यांना दिले. हा प्रकार इंग्रज काळातील छळवणुकीपेक्षाही भयंकर आहे, असे डेलकर म्हणाले होते. 

ते लोकसभेमध्ये आपला राजीनामा देऊन आपली व्यथा मांडणार होते. काही दिवसांपूर्वीच संसदेत मागच्या अधिवेशनातील आपल्या भाषणात त्यांनी यासंदर्भातील आपली व्यथा मांडली होती. त्यामध्ये त्यांना कशाप्रकारे खोट्या केसेसमध्ये गुंतवून बदनाम आणि अपमानित केले जाते याची कैफियत त्यांनी मांडली होती. त्यांनी मुंबईमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी १६ पानांची सुसाईड नोट लिहिली आहे त्यामध्ये पोलीस, प्रशासकीय अधिका-यांसमवेत भाजपचे नेते व गुजरातचे माजी गृहमंत्री व दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. सदर व्यक्ती ही भाजपचे मोठे नेते असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे आहेत. त्यामुळे सखोल चौकशी करण्याची मागणी सावंत यांनी केली. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ती मान्य केली आहे. देशभरातील विविध राज्यात विरोधी पक्षाचे नेते आमदार, खासदारांना व सरकारांना अशाच प्रकारचा त्रास दिला जात आहे. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांना हाताशी धरून महाराष्ट्रातील आमदार खासदारांनाही अशाच प्रकारचा त्रास केंद्रातील भाजप सरकारकडून दिला जात आहे. डेलकरांची आत्महत्येने देशात लोकशाही आहे का ? असा प्रश्न निर्माण करणारी परिस्थिती देशात आहे असे सावंत म्हणाले.

या शिष्टमंडळात सावंत यांच्यासमवेत काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, सोशल मीडिया विभागाचे विनय खामकर सहभागी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com