सचिन पायलट यांची काँग्रेसवर मात; सोशल मीडियावरही दोन गट - Sachin Pilot trending on twitter amid controversy in Rajasthan Congress | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन पायलट यांची काँग्रेसवर मात; सोशल मीडियावरही दोन गट

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 जून 2021

पायलट यांनी नुकताच दिल्ली दौरा केला होता. परंतु, पक्षश्रेष्ठींनी त्यांना भेट देणे टाळल्याने पायलट राजस्थानला परतले.

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने पायलट नाराज आहेत. त्यांनी उघडपणे ही नाराजी व्यक्त केली असून आता पक्षावर दबाव टाकण्यासाठी रणनीती आखली जात आहे. आज त्याचाच प्रत्यय ट्विटवर पाहायला मिळाला आहे. सोशल मीडियावर पायलट यांनी काँग्रेसला पिछाडीवर टाकल्याचे दिसून आले. (Sachin Pilot trending on twitter amid controversy in Rajasthan Congress)

पायलट यांनी नुकताच दिल्ली दौरा केला होता. परंतु, पक्षश्रेष्ठींनी त्यांना भेट देणे टाळल्याने पायलट राजस्थानला परतले. आता काँग्रेसच्या नेतृत्वाने पायलट यांच्यासमोर नमती भूमिका घेतली आहे. पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यासुद्धा पायलट यांच्या कायम संपर्कात आहेत. पण पायलट यांच्या मागण्या मान्य करण्यात न आल्याने त्यांचे समर्थक आमदार व कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. तर गेहलोत यांच्याकडून पायलट यांना शह देण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. 

हेही वाचा : पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांत आटोपणार; फडणवीसांचा सरकारवर घणाघात

आज सकाळपासून ट्विटरवर #काँग्रेस_आ_रही_है हा ट्रेंड सुरू होता. पण त्यानंतर काही वेळातच #पायलट_आ_रहा_है या ट्रेंड सुरू झाला. सध्या हा भारतात सर्वाधिक ट्रेंडिगमध्ये असून एक लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी या ट्रेंडवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काँग्रेसच्या ट्रेंडला जेमतेम 50 हजार नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. पायलट यांच्या समर्थकांनी जाणीवपूर्वक हा ट्रेंड चालवल्याचे बोलले जात आहे. यावरून आता सोशल मीडियातही काँग्रेसचे दोन गट पडल्याचे स्पष्ट झालं आहे.

पायलट यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमधील विधानसभेच्या आगामी निवडणुका लढाव्यात, पायलट यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करावे, अशा अनेक मागण्या ट्विटरवर केल्या जात आहेत. राजस्थानमध्येही पायलट यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पायलट यांनी आमदारांच्या गाठीभेठी सुरू केल्याचे समजते. त्यामुळं पुढील काही दिवसांत गेहलोत यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

पायलट यांना आपल्या समर्थक आमदारांना मंत्रीमंडळात स्थान देण्याची मागणी केली आहे. तसेच राज्यातील पक्षाची धुरा हाती देण्याची मागणीही आहे. पण या दोन्ही मागण्या मान्य होत नसल्याने ते नाराज आहेत. त्यातच बसपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या तीन आमदारांनी पायलट यांचा उल्लेख गद्दार असा केल्याने वादात आणखी भर पडली आहे. पायलट हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही आहे. पण पायलट यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख