सचिन पायलटांनी गद्दारी केली; चार काँग्रेस आमदारांनी विरोधात फडकावलं निशाण - Sachin Pilot betrayed says four congress MLAs | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

सचिन पायलटांनी गद्दारी केली; चार काँग्रेस आमदारांनी विरोधात फडकावलं निशाण

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जून 2021

पायलट यांनी मागील वर्षी केलेल्या बंडावेळी पक्षाने दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केलेली नाहीत.

नवी दिल्ली : राजस्थानमधील (Rajasthan) काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. पण मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पायलट यांच्यात असलेला वाद मिटण्याची चिन्हं दिसत नाही. बहूजन समाज पक्षातून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या आमदारांनी आता पायलट गटावर जोरदार टीका केली आहे. गेहलोत यांच्या इशाऱ्यावरून हा विरोध सुरू झाल्याची चर्चा आहे. (Sachin Pilot betrayed says four congress MLAs)

सचिन पायलट सध्या दिल्लीत आहेत. पक्षाच्या नेतृत्वाची ते भेट घेणार असल्याची चर्चा आहे. पायलट यांनी मागील वर्षी केलेल्या बंडावेळी पक्षाने दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. यातच जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने पायलट यांनी पक्षाला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. पक्ष कायम आपल्याला गृहित धरु शकत नाही, असा गर्भित इशाराही पायलट यांनी दिला आहे. 

हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी प्रकाश आंबेडकर उतरणार मैदानात

राजस्थानमधील सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे. पायलट यांनी बंड केले त्यावेळी साथ देणाऱ्या अपक्ष व इतर आमदारांना डावलता येणार नाही, असे गेहलोत यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. हा आता वादाचा मुद्दा बनला आहे. 

त्यातच बसपमधून काँग्रेसमध्ये आलेले आमदार राजेंद्र सिंह गुढा, जोगेंद्र अवाना, लाखन सिंह आणि संदीप यादव यांनी एका सुरात पायलट गटावर टीका केली आहे. कॅबिनेट मंत्री झालेले पक्षाला सोडून गेले. पण आम्ही सरकार वाचवले. पक्षश्रेष्ठींना पक्षाशी प्रामाणिक कोण आहे, हे पाहायला हवे. ज्यांनी सरकार वाचवले त्यांचा मान राखायला हवा. पक्षातील काही लोक सतत पक्षावर दबाव टाकत आहेत. त्यांनी सरकारला अस्थिर करण्याचे काम केले. अशोक गेहलोत आमचे नेते आहेत आणि तेच राहतील, अशी भूमिका या चारही आमदारांनी घेतली आहे.

हेही वाचा : भाजपच्या 24 आमदारांची राज्यपालांसोबतच्या बैठकीला दांडी; घरवापसीची शक्यता

काँग्रेसमध्ये असे नाटक होईल, हे आम्हाला माहित नव्हते. आम्ही प्रामाणिकपणे काँग्रेसमध्ये आलो. अजूनही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार आहे. तरीही आम्हाला वेगळ्या नजरेनं पाहिलं जात आहे. काही लोकांनी पक्षाशी गद्दारी करून सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. ते कोणत्या हक्काने पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकत आहेत, असे वक्तव्य यादव यांनी केलं आहे.

चार आमदारांच्या या भूमिकेमुळे राजस्थानमधील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गद्दारी या शब्दावर पायलट गटाकडून जोरदार विरोध होउ शकतो. या गटाला शह देण्यासाठीच गेहलोत यांनी चौघांना पुढे केल्याचे बोलले जात आहे. या चौघांपैकी किमान एकाला मंत्रीपद मिळावे, यादृष्टीने प्रयत्न सुरू असून त्यासाठी गेहलोतही आग्रही आहेत. पण पायलट गटाकडूनही मंत्रीपदासाठी दबाव असल्याने मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख