माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन - RLD Chief Ajit Singh Chaudhary dies due to Corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 मे 2021

माजी पंतप्रधान चरण सिंह यांचे अजित सिंह हे पुत्र होते.

लखनऊ : माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय लोक दलाचे (RLD) प्रमुख अजित सिंह चौधरी (Ajit Singh Chaudhary) यांचे आज कोरोनामुळे (Covid-19) निधन झाले. त्यांच्यावर मागील 15 दिवसांपासून गुरूग्राम येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. फुफ्फुसामध्ये संसर्ग झाल्याने मंगळवारी रात्रीपासून त्यांच्या प्रकृती खालावली होती. (RLD Chief Ajit Singh Chaudhary dies due to Corona)

अजित सिंह यांचे पुत्र माजी खासदार जयंत चौधरी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. अजित सिंह हे उत्तर प्रदेशातील मोठे नेते होते. त्यांना 20 एप्रिल रोजी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. ते 82 वर्षांचे होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृती सातत्याने खालावत गेली. काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर गुरूवारी सकाळी 8.20 वाजता त्यांचे कोरोनाशी लढताना निधन झाले.

हेही वाचा : CBI च्या FIR मधील ते तीन परिच्छेद म्हणजे सरकार पाडण्याचा डाव

माजी पंतप्रधान चरण सिंह यांचे अजित सिंह हे पुत्र होते. अजित सिंह हे आठ वेळा खासदार राहिले आहेत. त्यातील एक टर्म ते राज्यसभेचे खासदार होते. चारवेळा केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राजकारणात येण्यापूर्वी अजित सिंह हे 15 वर्ष अमेरिकेत संगणक व्यवसायात होते. खरगपुर आयआयटीचे ते विद्यार्थी होते. भारतात आल्यानंतर 1986 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार झाले. 

लोकसभेमध्ये सातवेळा निवडून गेले. जाट लोकसंख्या अधिक असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या पक्षाचा दबदबा आहे. अजित सिंह यांनी राजकारणामध्ये काँग्रेससह भाजप आणि समाजवादी पक्षाशीही हातमिळवणी केली. सत्तेच्या बाजूने त्यांनी नेहमी उडी घेतल्याचे राजकीय विश्लेषक म्हणतात. व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये ते पहिल्यांदा केंद्रीय मंत्री झाले. त्यांच्याकडे उद्योग खात्याची जबाबदारी होती. त्यानंतर पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्येही केंद्रीय मंत्रीपद मिळवले. पण 1996 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. राष्ट्रीय लोकदलाची स्थापना करून ते अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये कृषी मंत्री झाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अजित सिंह 2003 पर्यंत होते. त्यानंतर त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीची साथ दिली. 

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून आदरांजली

अजित सिंह यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले. "अजित सिंह यांनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला. एक लोकप्रतिनिधी आणि मंत्री म्हणून त्यांनी देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटवला आहे," अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित सिंह यांना आदरांजली वाहिली. ''अजित सिंह यांच्या निधनाने खुप दु:ख झाले आहे. त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी झटत राहिले. त्यांनी केंद्रात अनेक विभागांमध्ये कुशलतेने काम केले,'' अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख