कोण आहे रिहाना? पंतप्रधान मोदींपेक्षा दुप्पट फॉलोअर अन् जगभरात कोट्यवधी चाहते - Rihanna has twice followers all over the world compare to PM Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

कोण आहे रिहाना? पंतप्रधान मोदींपेक्षा दुप्पट फॉलोअर अन् जगभरात कोट्यवधी चाहते

वृत्तसंस्था
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट करून जगप्रसिध्द पॉप स्टार रिहाना प्रकाशझोतात आली आहे. तिचे जगभरात कोट्यावधी चाहते असल्याने शेतकरी आंदोलनाकडे जगाचे लक्ष वेधले गेले.

नवी दिल्ली : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट करून जगप्रसिध्द पॉप स्टार रिहाना प्रकाशझोतात आली आहे. तिचे जगभरात कोट्यावधी चाहते असल्याने शेतकरी आंदोलनाकडे जगाचे लक्ष वेधले गेले. ट्विटर तिचे तब्बल 10 कोटींहून अधिक फॉलोअर असून पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा ही संख्या जवळपास दुप्पट आहे. 

कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने सीमेवरील सुरक्षा कडक केली आहे. या आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे. आता हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलं आहे.  

रिहानाच्या या ट्विटनंतर भारतासह जगभरात तिची चर्चा सुरू झाली आहे. गुगल सर्चमध्ये तिचे नाव सध्या आघाडीवर आहे. रिहाना केवळ 32 वर्षांची असून जगप्रसिध्द पॉप गायिका, अभिनेत्री आहे. तिचा जन्म 20 जानेवारी 1988 रोजी बार्बाडोसमध्ये झाला आहे. रॉबिन रिहाना फेंटी हे तिचे पूर्ण नाव आहे. वयाच्या 15 व्या वर्षीच तिने संगीत क्षेत्रातील आपले करिअर सुरू केले.

'म्युझिक अॉफ द सन' हा तिचा पहिला अल्बम आहेत. तर 2007 मध्ये आलेल्या 'गुड गर्ल गॉन बॅड' या अल्बमने तिला नावलौकिक मिळवून दिला. जगभरात तिच्या चाहत्यांमध्ये वेगाने वाढ झाली. त्यानंतर जवळपास तिच्या प्रत्येक अल्बमने चाहत्यांची मने जिंकली. आतापर्यंत तिला नऊ वेळा प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार मिळालाय. तर 13 अमेरिकन म्युझिक अॅवॉर्ड्स, 12 बिलबोर्ड म्युझिक अॅवॉर्ड मिळाले आहेत. तिच्या नावावर सहा गिनिज वर्ल्ड रेकार्ड आहेत. 

फोर्ब्सने 2012 व 2014 मध्ये सर्वाधिक मानधन असलेल्या पहिल्या 10 कलाकारांमध्ये तिचा समावेश केला होता. तर टाईम मॅगझिनने 2012 व 2018 मध्ये जगातील पहिल्या 100 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिचा समावेश केला. तिचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. तिचे फेसबुकवर आठ कोटी, ट्विटरवर 10 कोटींहून अधिक तर इन्स्टाग्रामवर 9 कोटींहून अधिक फॉलोअर आहेत. सर्वाधिक श्रीमंत पॉप स्टारमध्ये ती अव्वल आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर सुमारे साडे सहा कोटी तर फेसबुकवर साडे चार कोटी फॉलोअर आहेत. रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन देणारे ट्विट केल्यानंतर त्याला जवळपास साडे पाच लाख लाईक्स आणि सुमारे अडीच लाख लोकांनी ते शेअर केले आहे. 

काय म्हटले आहे रिहानाने?

रिहाने ट्विटरवर एक बातमी शेअर केली आहे. यात आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात, शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांत कशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, हेही सांगितले आहे. रिहानाने या न्यूज बरोबर ''यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही आहोत'' कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 

कंगना राणावतचे प्रत्युत्तर

रिहानाच्या ट्विटनंतर कंगनानेही तिला ट्विटरवर प्रत्युत्तर दिले आहे. ती म्हणते, ''याविषयी कोणीच काही बोलणार नाही. कारण ते शेतकरी नसून दहशतवादी आहे. भारताला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर चीन विभाजन झालेल्या भाग ताब्यात घेवून तिथे चायनीज कॉलनी उभारेल. तुमच्यासारखा आम्ही आमचा देश विकत नाही,'' असे कंगनाने म्हटले आहे. यावरच न थांबता कंगनाने एकामागोमाग एक ट्विटची मालिकाच सुरू केली आहे. रिहानावर अनेक वादग्रस्त आरोप तिने केले आहेत. खलिस्तानीशी संबंध असल्याचा आरोप करून त्यासोबत काही छायाचित्र टाकली आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख