राष्ट्रीय स्वयंसंघाचा कंगना राणावतला पाठिंबा..

रामलाल यांनी टीका करताना कोणाचे नाव घेतले नसले तरी कंगनाच्या बेकायदेशीर घरावर हातोडा पडल्यावर त्यांना हातोडाच आठवावा हे पुरेसे सूचक मानले जाते.
gagane new.jpg
gagane new.jpg

नवी दिल्ली : मुंबईला पाकिस्तानची उपमा देणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतचे बेकायदा बांधकाम मुंबई महापालिकेनं आज पाडलं. यावरअनेक जणांनी टिका केली आहे. या वादात आता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने उडी घेतली आहे. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) अखिल भारतीय सहप्रमुख रामलाल यांनी कंगनाच्या बाजूनं टि्वट केलं आहे. याबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. "असत्याच्या हातोड्याने सत्याचा पाया डळमळीत होत नाही' अशा शब्दांत या कारवाईचा संघाने निषेध केला आहे. रामलाल यांनी टीका करताना कोणाचे नाव घेतले नसले तरी कंगनाच्या बेकायदेशीर घरावर हातोडा पडल्यावर त्यांना हातोडाच आठवावा हे पुरेसे सूचक मानले जाते. 

कंगना राणावत व राज्य सरकार, विशेषतः शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. मुंबईवर कंगनाने केलेल्या वक्तव्यावर तिचा निषेध होत असताना मुंबई महापालिकेने पाली हिल भागातील तिच्या बेकायदेशीर बांधकामावर धडक कारवाई केली. यामुळे संघपरिवारात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. संघाच्याच एका वरिष्ठ नेत्याने टि्वट केल्याने सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटत आहे. 

संघाचे अखिल भारतीय सहप्रमुख रामलाल यांनी ट्‌विटद्वारे कंगना हिच्या कार्यालयावरील कारवाईबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. "असत्याच्या हातोड्याने सत्याचा पाया डळमळीत होत नाही' असे ट्‌विट रामलाल यांनी केले. रामलाल यांच्याशिवाय भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी व पक्षनेते तेंजिदरसिंग बग्गा यांनीही कंगनाला उघड पाठिंबा दिला आहे. रामलाल हे संघात सध्या कार्यरत असले तरी भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री म्हणून त्यांनी प्रदीर्घकाळ काम केले आहे. त्यांना भाजपची एक पक्ष म्हणून अत्यंत बारकाईने माहिती आहे. इतक्‍या वरिष्ठ संघनेत्याने एका अभिनेत्रीबाबत चाललेल्या वादंगात सूचक पण उघडपणे उडी घेणे अतिशय लक्षणीय मानले जात आहे.
 
अभिनेत्री कंगना राणावत हिच्या पाली हिल येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने आज पाडून टाकले. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कंगनाने पुन्हा मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली आहे. यावरुन आता पुन्हा मोठा गदारोळ सुरू झाला आहे. आता या वादात उत्तर भारतीय नेते उडी घेऊ लागले आहेत. अनेक नेते कंगनाला पाठिंबा देऊ लागले आहेत. यामुळे पुन्हा एकदा उत्तर भारत विरुद्ध महाराष्ट्र हा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

कंगनाविरोधात महाराष्ट्रात वातावरण तापले असल्याने केंद्रातील मोदी सरकारने तिला 'वाय' सुरक्षा दिली आहे. तिने 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचे जाहीर केले होते. यावर शिवसेनेने कंगनाला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशा इशारा दिला होता. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनाला होम क्वारंटाईन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे कंगनाने मुंबईला जाण्यासाठी जोरदार तयारी केली. तिने कालच कोरोना चाचणी केली. मुंबईत गेल्यानंतर होम क्वारंटाईन व्हावे लागू नये म्हणून तिने ही शक्कल लढविली होती. 

कंगनासोबत तिची बहीण रंगोली चंडेल आणि आणखी एका व्यक्तीची चाचणी करण्यात आली होती. कंगना आज सकाळी वाय सुरक्षेसह चंडीगडमधील चंडीगड विमानतळावर आली. तेथून विमानाने ती मुंबईकडे रवाना झाली होती. ती मुंबई विमानतळावर दाखल झाली. कंगनाचे विमानतळावर दाखल झाल्यानंतर सीआरपीएफच्या पथकाने तिला त्यांच्या वाहनात बसवले. तेथून तिला घेऊन तातडीने पथक बाहेर पडले. 

कंगनाला विरोध करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने विमानतळावर जमले होते. याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्तेही विमानतळावर जमले आहेत. शिवसैनिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विमानतळावर जोरदार घोषणाबाजी सुरू होती.विमानतळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) बंदोबस्त तैनात करण्यात आला होती. यात करनी सेनाही कंगनाच्या बाजूने मैदानात उतरली होती. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com